
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईचा गणेशोत्सव सातासमुद्रार गेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी देशविदेशातून नागरिक हा गणेशोत्सव पाहाण्यासाठी येतात. लालबाग, परळचा गणेशोत्सव तर त्यांच्यासाठी ठरलेली पर्वणी. लालबागचा राजाच्या चरणी माथा टेकवल्याशिवाय भाविक पुढे सरकतच नाहीत. परंतु, यंदा भाविकांचा हा दरवर्षीचा भक्तीमार्ग मंदावला आहे. मोनोचे मोठमोठे पिलर्स, मेट्रो रेल्वे आणि एमएमआरडीएची रखडलेली कामे, जागोजागी खोदून ठेवलेले रस्ते आणि पावसामुळे रस्तोरस्ती झालेला चिखल, खड्डे आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे यंदा भाविकांचा उत्साह आटलेला दिसत आहे. आज चौथ्या दिवशी रविवार असूनही परळ, लालबागमध्ये अजून नेहमीची गर्दी दिसत नसल्याचेच चित्र आहे.
मेट्रो मार्गासाठी मेट्रो रेल्वेने मुंबईत जागोजागी खोदकामे केली आहेत. त्यामुळे अनेक रस्ते चिंचोळे झाले असून या रस्त्याने पादचारी आणि वाहनेही जात असल्यामुळे भाविकांना चालणेही मुश्कील होऊन बसले आहे. लालबागला स्वतःच्या वाहनाने जाणाऱया भाविकांनाही वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मोनोचे मोठमोठे पिलर आणि मेट्रोची कामे
लोअर परळ आणि आर्थर रोड याठिकाणी मोनोचा मार्ग आहे. मोनोचे मोठमोठे पिलर जागोजागी उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथे गर्दी झालीच तर या पिलर्समुळे गर्दी संथ गतीने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.
मुंबईच्या पोटात घुसखोरी, वाहतुकीचा खोळंबा
मेट्रो रेल्वे महामंडळाने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गासाठी जमिनीखाली 30 मीटर खोलवर टीबीएम मशीन्सनी भुयारे खोदली आहेत. रविवारी मुंबईत पाऊस पडल्याने भुयारे खोदलेल्या ठिकाणी पाणी साचून मोठय़ा प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबईत अनेक ठिकाणी रविवारी वाहतूक कोंडी झाली. परिणामी, भाविकांना लालबागला पोहोण्यासाठी बराच वेळ लागत होता. अनेक भाविकांनी तर आपला मार्गच बदलून घरचा रस्ता धरला.
मेगाब्लॉकमुळे भाविक झाले हैराण
ऐन गणेशोत्सवात विकेण्डलाच मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला. हार्बर रेल्वे सेवाही ठप्प होती. त्यामुळे अनेक भाविकांनी खासगी वाहने बाहेर काढली. परंतु, मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि तिथेच भक्तांचा घात झाला. तर मेगाब्लॉकमुळे लोकलला प्रचंड गर्दी होती. ही गर्दी लोअर परळ, करीरोड स्थानकात येऊन धडकत होती. या स्थानकांमधून लालबागपर्यंत वाट काढताना भक्तांच्या नाकीनऊ आले.
दहिसर ते अंधेरीकडूनही कोंडी
पश्चिम दुतगती महामार्ग आणि लिंक रोडवर एमएमआरडीएची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी डेब्रीज हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, अंधेरी ते दहिसर पूर्व मेट्रो-7 आणि अंधेरी ते दहिसर पश्चिम मेट्रो-2 ए या मार्गावरील डेब्रीज हटवण्याची केवळ 30 टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून येथून खासगी वाहनाने येणाऱया भाविकांची मोठी कोंडी झाली.
भक्तांना याचा फटका
दिवसभर सुरू असलेल्या पायलिंगमुळे भाविकांना रस्त्याने चालणेही मुश्कील झाले.
खोदकामातून निघालेल्या डेब्रीजमुळेही अनेक रस्ते चिंचोळे झाले.
रस्ते चिंचोळे झाल्याने परळपासून लालबागपर्यंत तर दुसरीकडे दक्षिण मुंबईपासून लालबागपर्यंत संध्याकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला.
अधुनमधून कोसळणाऱया पावसामुळे जागोजागी चिखल झाला. खड्डय़ांमुळे वाहतुक संथ गतीने पुढे सरकत होती.
रस्त्यांशेजारीच उभारलेल्या बॅरीकेड्समुळे भाविकांना लालबागला पोहोचणे कठीण बनले.
पार्किंगचे वांदे
मुंबईत पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. त्यातच मेट्रोने जागोजागी खोदून ठेवल्याने हा प्रश्न आणखीनच जटील बनला आहे. रविवारी मेगाब्लॉक असल्याने अनेकांनी खासगी वाहने घराबाहेर काढली. परंतु, पार्किंगच मिळाले नाही. त्यामुळे पार्किंगसाठी जागा शोधताना भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. पार्किंगच्या जागेअभावी अनेकांनी खासगी वाहनाने प्रवास न करणेच पसंत केले. परिणामी, लालबागमधील गर्दीचा ओघ कमी झाला.
लोअर परळच्या पुलाने केली गोची
लोअर परळचा धोकादायक पूल गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे लोअर परळ स्टेशनमधून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना चिंचोळ्या मार्गाने वाट काढत वळसा घेऊन लालबागची वाट धरावी लागत आहे.
summary- devotees crowd reduce causing metro work and traffic jam

























































