दुसऱ्या श्रावण सोमवारी परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दुसर्‍या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच भाविक भक्तांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला. दिवसभरात विविध राज्यातून हजारो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिर परिसरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातील भाविक दाखल होत असून दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक झाले. रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासुन वैद्यनाथाचे दर्शन सुरू झाले होते. धर्मदर्शन रांगेत मध्यरात्री पासूनच भाविकांचा मोठी गर्दी होती. दर्शन पास रांगेतून दर्शनासाठी भाविक दाखल झाले होते. दरम्यान मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला असून वैद्यनाथ भगवान की जय,बम बम भोले असा जयघोष केला गेला. मेरुप्रदक्षिणा करून जगमित्रनागा समाधीदर्शन करण्याची परंपरा परळीत आहे. दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने परळीपंचक्रोशीतील विविध गावामधून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन भाविकांनी मेरुप्रदक्षिणा करून आपली वारी पूर्ण केली.

श्रावणात वैद्यनाथ मंदिरात वयोवृद्ध व शारीरिक अपंगत्व आलेल्या भाविकांनाही दर्शन घेण्याची ईच्छा असते. गर्दी नसताना वृद्ध,अपंग भाविक आहे त्या परिस्थितीत दर्शन घेतात.मात्र गर्दी व सुरक्षा व्यवस्था,दर्शनव्यवस्था या मध्ये वयोवृद्ध,अपंग भाविक मात्र दर्शनापासून दूर राहतात. वैद्यनाथ मंदिर येथे वयोवृद्ध व शारीरिक अपंगत्व आलेल्या भाविकांना दर्शन घेण्याची कोणतीही व्यवस्था दिसून येत नाही. मंदिरात विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या वैद्यनाथ देवल कमिटीने याकडेही लक्ष द्यावे जेणे करून वयोवृद्ध,अपंग भाविक दर्शनापासून वंचित राहणार नाहीत अशी चर्चा भाविकांतुन होत आहे.

summary…devotees-crowed-at-parlis-vaidynath-temple