जय भराडीदेवी! आंगणेवाडी यात्रेसाठी लाखो मुंबईकर कोकणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोकणातील आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या यात्रोत्सवासाठी लाखो मुंबईकर रवाना झाले आहेत. उद्या 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजल्यापासून आई भराडीची पूजा आणि दर्शन सोहळ्याला प्रारंभ होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मंडळी या यात्रेसाठी आंगणेवाडीत दाखल झाले आहेत.

भराडीदेवीच्या यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांच्या सोयीसाठी दर्शनासाठी 10 विशेष रांगा बनवण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मंदिर रोषणाई आणि फुलांनी सजले आहे. मुंबईकर कोकणवासीय या यात्रेसाठी दरवर्षी आवर्जून कोकणात जातात. सामान्य भाविकच नव्हे तर राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचीही तिथे दर्शनासाठी गर्दी असते.

आंगणे कुटुंबिय, ग्रामपंचायत, महसूल पंचायत यांच्यासह गावातील मंडळांचे शेकडो कार्यकर्ते यात्रेमध्ये भाविकांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना अवघ्या 20 मिनिटांत दर्शन होईल अशी सुविधा करण्यात आली आहे.