
सामना प्रतिनिधी, राहुरी
आषाढी अमावस्या निमित्ताने शनिवारी शनी व राहूच्या एकत्र दर्शनाबरोबरच कोहळे खरेदीसाठी राहुरीत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पुरातन काळात देव व दानवांच्या युद्धात राहू राक्षसाचे मुंडके या परिसरात पडल्याने राहुरी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. अमावस्येला राहू व शनीचे एकत्र दर्शन होत असल्याची श्रद्धा असल्याने शिर्डी व शिंगणापूर या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी आज राहुरीत हजेरी लावली.
आषाढी अमावस्या असल्याने राहुरी शहरात कोहळे, रूईच्या पानाचे हार, तेलविक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. कोहळ्याची ७० ते ८० रूपये प्रतिनग दराने विक्री झाली. दर्शनासाठी येणाऱ्यां भाविकांना उपवासाचे पदार्थ, केळ्यांचे वाटप करण्यात आले. अमावस्येनिमित्त शनिवारी शनी आणि मारूती मंदिरात संपूर्ण दिवस पूजापाठ सुरू असल्याने राहुरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शिंगणापूर व शिर्डी या धार्मिक स्थळांकडे जाणारे राहुरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आज नगर मनमाड राज्य मार्गावर भाविकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.





























































