
देवाला बोललेला नवस फेडण्यासाठी अनेकजण बरेच काही करतात. एकदा नवस फेडायचा ठरवले , की तो फेडण्यासाठी भक्त मागे हटत नाही. अशीच एक घटना वांझोळे गवळीवाडी येथील अजित महादेव गवळी यांच्याबाबत घडली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी मुंबई ते वांझोळे असा 22 तासांचा आणि तब्बल 350 किलोमीटरचा सायकल प्रवास त्यांनी यशस्वी केला आहे. नवस फेडण्यासाठी त्यांनी हा प्रवास केला आहे.
वांझोळे खुर्द, गवळीवाडी येथे अजित महादेव गवळी राहतात. गावचे ग्रामदैवत आई जुगाई देवीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या अजित गवळी यांनी एकदा तरी तुझ्या शिमगोत्सवाला सायकलने प्रवास करून येईन, असा नवस केला होता. दोन वर्षे कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. त्यामुळे यावर्षी हा नवस फेडायचाच असा निर्धार त्यांनी केला. बुधवारी ( 23 मार्च 2022) दुपारी 3 वाजता मुंबईतील श्री सिद्धीविनायकचे दर्शन घेत त्यांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली.
सोबत कोणी नाही, तो पूर्ण दिवस आणि रात्रीसुध्दा त्यांचा प्रवास सुरू होता, नवस पूर्ण करण्याच्या निर्धाराने ते प्रवास करत होते. गुरुवारी (24 मार्च 2022) दुपारी 1 वाजता सुमारे 22 तासांचा प्रवास करत ते वांझोळे गवळीवाडी येथे पोहचले. गावात जाण्यापूर्वी त्यांनी देवरुखची ग्रामदेवता सोळजाई मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व तेथील रहिवाशी यांनी जंगी स्वागत केलं.
25 मार्च रोजी जुगाईदेवी मंदिरात पालखी वास्तव्यास असल्याने रात्री विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत, त्यावेळी वाडीप्रमुख पांडुरंग सदाशिव वाजे व गावकर सिताराम रत्नु वाजे यांच्या हस्ते अजित महादेव गवळी यांचा सत्कार करण्यात आला. देवाच्या भेटीसाठी भक्ताची ओढ कशी असते आणि ती कशी पूर्ण होते याची प्रचीती सर्वाना यातून आली.




























































