देवरुख बस स्टॅंडवर प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात जोरदार राडा

789

देवरुख येथील एसटी आगाराच्या भोंगळ कारभारावर चाकरमान्यांचा उद्रेक होण्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मार्गफलक लावण्यावरुन प्रवासी व चालकामध्ये चांगलीच जुंपली. प्रकार हाणामारीपर्यंत गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेर त्या प्रवाशाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली आणि काहीकाळ आगारातील वातावरण तंग झाले होते. यामुळे अर्धातास एकही फेरी सुटलेली नव्हती.

गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणार्‍या चाकरमान्यांची सोय करण्यासाठी 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान देवरुख आगाराने तब्बल 365 ज्यादा गाड्या सोडण्याचा विक्रम केला. मात्र हाच विक्रम प्रवाशांच्या अंगलटी आला. याच दरम्यान प्रवाशांनी बसफेर्‍यांचे वेळापत्रक कोलमडल्याने मध्यरात्री देवरुख आगारात हंगामा केला होता. अखेर देवरुख पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रकार शांत केला. असाच काहीसा प्रकार सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडला. चालक गणेशकुमार शामराव वायदंडे हे आपल्यासोबत वाहक आहेत की नाहीत हे विचारण्यासाठी कंट्रोल केबीनकडे निघाले होते. त्याचदरम्यान काटवली येथील प्रवासी सुर्यकांत दौलत गुरव यांनी वायदंडे यांना गाडीला बोर्ड का नाही असा सवाल केला. त्यावेळी चालकाने वाहकाला विचारुन बोर्ड लावतो असे सांगितल्यावर संतापलेल्या गुरव यांनी वायदंडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यात त्यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या अंगावर छत्री उगारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान प्रकार हात घाईवर येत असल्याचे दिसताच अन्य कर्मचार्‍यांनी त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण अधिकच बिघडले. यातून बसस्थानकात गोंधळ माजला. या प्रकारात सुमारे 20 मिनिटे एकही बस सुटली नाही. तोपर्यंत देवरुख पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी इतर प्रवाशांना शांत करत गुरव यांच्यासह संबंधित चालकाला पोलिस ठाण्यात आणला. या दरम्यान काटवली मार्ग वगळता उर्वरित फेर्‍या सोडण्यात आल्या. त्यामुळे वातावरण शांत झाले. चालक वायदंडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सुर्यकांत गुरव यांच्यावर भा.दं.वि.कलम 352, 504,506, 186 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. का. डी. एस. पवार करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या