मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रंगला परमेश्वराचा विवाह सोहळा

सह्यशिखरांवर निसर्गसानिध्यात वसलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र परंपरेत खंड पडू नये यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक विधी करण्यात आले.

गेल्या जवळपास 500 वर्षात प्रथमच कोरोनामुळे मार्लेश्वर यात्रोत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्याची ही अशी वेळ आल्याचे नाराजीच्या सुरातच विश्वस्त मंडळाने सांगितले. यावर्षी मार्लेश्वर यात्रेला जाता न आल्याने भक्तगण मात्र कमालीचे नाराज झाले. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण देवाचा विवाहसोहळा पहाण्यासाठी येत असतात. मार्लेश्वर यात्रोत्सव रद्द केल्याने लाखोंची उलाढाल मात्र थांबली आहे.

कोरोनामुळे यंदा श्री क्षेत्र मार्लेश्वरचा यात्रोत्सव रद्द केला गेला. यामुळे लाखो रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, फिरस्ते यांना याची झळ बसली आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत श्री मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. श्रीदेव मार्लेश्वर व साखरपा येथील श्री गिरिजा देवी यांचा 14 जानेवारीला लग्नसोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी कुणीही निमंत्रण न देता लाखो वऱ्हाडी जमत असतात. सोहळ्याला जत्रेचे स्वरूप येते. तीन दिवस मार्लेश्वर, मारळ, आगवली, मुरादपूर, देवरूख, साखरपा, हातीव या भागांत भाविकांची वर्दळ असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे यावर बंधने आली आहेत

आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा कल्याणविधी (विवाह) सोहळा पार पडला. सर्व मानकरी, देवस्थान समितीचे विश्वस्त आणि प्रमुख आयोजकच यावेळी उपस्थित होते. मार्लेश्वर नगरीत गर्दी होवु नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या