धामापूर तलाव ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाचा मानला जाणारा ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ पुरस्कारासाठी मालवण तालुक्यातील धामापूर गावात असलेला पाण्याचा मुख्य जलस्रोत धामापूर तलावाची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जगभरातील हेरिटेज तलावांसाठी एकूण चौदा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात हिंदुस्थान 4, चीन 4, इराण 2, जपान 3, तर कोरियाच्या एक तलावाची निवड झाली आहे. यासह फार्मर अवॉर्ड साठी मायक्रो इरिगेशन व फर्टिगेशन याविभागातून मेकला शिवा शंकर रेड्डी या शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.

इंडियन नॅशनल कमिटीच्या वतीने आयसीआयडीकडे संपूर्ण देशातून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जुलै – ऑगस्ट महिन्यात सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सिडब्लूपीआरएस) या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील पुणे येथील आस्थापनाकडून व सेंट्रल वॉटर कमिशनकडून धामापूर तलावाचे सर्वेक्षण झाले होते. मुख्य अभियंता केशव मूर्ती, यांच्यासह  स्यमंतक या संस्थेचे एनजीओ सचिन देसाई, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडीचे उप विभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी त्यावेळी योग्य प्रकारे सर्व माहितीचा अहवाल नवी दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनला दिला होता.

मालवण तालुक्यातील धामापूर तलाव हे एक रमणीय ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनले आहे. या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे. सुमारे 5 एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सदर पुरस्कारासाठी केवळ धामापूर तलावाची निवड झाल्याने मालवण तालुक्याच्या पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. धामापूर तलावाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन होत आहे.

प्राचीन धामापूर तलावाचे वैभव अणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यसाठी गेले अनेक वर्ष धामपुर येथील स्यमंतक संस्था ‘जीवन शिक्षण विद्यापीठ’ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याला यश प्राप्त झाले आहे.

हिंदुस्थानाला चार पुरस्कार

2018 साली आयसीआयडीच्या कॅनडा येथे संपन्न झालेल्या 69 व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषद मध्ये हिंदुस्थानला पहिल्यांदा “सदरमट्ट आनीकट्ट” आणि “पेड्डा चेरुवू” या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ म्हणून पुरस्कृत केले गेले होते.

2020 सालच्या 72 व्या  सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषद मध्ये जगातील 14 साईट्सना वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. या पैकी हिंदुस्थानात आंध्रप्रदेश मधील कुंबम तलाव (सन 1706 निर्मिती), के.सी कॅनल (सन 1863), पोरुममीला टॅंक (सन 1896) आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव (सन 1530) यांना हा मान प्राप्त होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या