
सामना प्रतिनिधी । पारध
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरण १०० टक्के भरले असून तडे गेलेल्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पारधसह चार गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारध येथील गणेशवाडी व रायघोळ नदीकाठावरील सव्वाशे कुंटुंबाना रात्रीचे घर सोडावे लागले. या सर्वांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून दिली आहे.
मागील आठवड्यापासून पारधसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आजपर्यंत रायघोळ नदीला ५ ते ६ वेळा पूर आला आहे. धामणा धरणाच्या वरील भागात मुसळधार पाऊस झाला आणि धरणाच्या सांडव्याला मोठमोठे तडे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर यांनी ही भेट देऊन संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांची चांगलीच खरपट्टी काढली. यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार, कनिष्ठ अभियंता यांनी ही घटना स्थळाला भेट देऊन धामणा धरणाची पाहणी केली.
धामणा धरणाच्या सांडव्याच्या तड्याने धरणाखालील पारधसह चार गावांत भितीचे वातावरण निर्माण झाले. काल ४ जुलै रोजी धरणाच्या वरील भागात मुसळधार झाला. रात्री ७ वाजेपर्यंत धामणा धरण १०० टक्के भरले आणि ही माहिती पारधमध्ये कळताच गावात दवंडीव्दारे सर्वांना कळविण्यात आले. रायघोळ नदीकाठावरील गणेशवाडीसह जवळजवळ सव्वाशे कुटुंबे सुरक्षित ठिकाणी गेली. ज्यांना आसरा नव्हता त्यांच्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी मदतीचा हात दिला व त्या कुटुंबाला स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इग्लीश स्कूलमध्ये तात्पुरता आसरा दिला आहे.



























































