धामणी नदीवर उभारले जाताहेत मातीचे बंधारे, शेतकरी, नागरिकांचा पाण्यासाठी 25 वर्षांचा अविरत संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा व करवीर या चार तालुक्यांना वरदान ठरू पाहणाऱया राधानगरी तालुक्यातील राई येथील 4.85 टीएमसी क्षमता असलेल्या धामणी प्रकल्पाचे काम या-ना कारणाने बंद होते. गेल्या 22 वर्षांपासून धामणी प्रकल्प पूर्णत्वास जाईल, याची धामणीवासीय बांधव, शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मात्र, अपूर्ण राहिलेल्या या प्रकल्पावर अवलंबून असलेली जनता वर्षोनुवर्षे या नदीवर नदीचा प्रवाह अडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून मातीचे बंधारे घालतात. यातून शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे. गेली 25 वर्षे या भागातील शेतकरी व नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अविरतपणे सुरू आहे.

धामणी खोऱयात पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. मात्र, साठवण प्रकल्प नसल्याने सर्व पाणी वाहून जाते. परिणामी, खोऱयात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवते. यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजनाने पुरवून वापरतो व आपली पिके वाढवतो. मात्र, हे पाणी मार्च-एप्रिलमध्येच संपून जाते. या खोऱयाला सुमारे तीन महिने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या राई-कंदलगावपासून पणोरेपर्यंत सुमारे 40च्या आसपास वाडय़ा-वस्त्यांना पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागतो.

राई, सुतारवाडी, बावेली, जरगी, पखालेवाडी, धुंदवडे या गावांना कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नसल्याने शेतकरी थेट नदी पाण्याचा प्रवाह अडवून मातीचे बांध घालतात. कडवे, शेळोशी, म्हासुर्ली, गवशी या गावांना कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असल्याने शेतकरी बंधाऱयाला समांतर मातीचा भरावा टाकून पाणी अडवितात. यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ व प्रत्येक बांधाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. यानुसार गेल्या पंचवीस वर्षांत शेतकऱयांचे चार ते पाच कोटी रुपये खर्च झालेले आहेत. परंतु धरण काही पूर्णत्वास गेलेले नाही. आज ना उद्या धरण पूर्ण होईल व आपला पाण्यासाठीचा संघर्ष कमी होईल, याकडे समस्त धामणीवासीय नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आम्ही समस्त धामणीवासीय शेतकरी गेली 22 वर्षे प्रकल्प पूर्णत्वास जाईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत. प्रकल्पास साठवण क्षमता नसल्याने भागातील शेतकरी लाखो रुपये खर्च करून मातीचे बंधारे घालून पाणी अडवितात; परंतु जेमतेम मार्चपर्यंतच पाणी पुरते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 100 कोटींचा निधी मंजूर झाला होता. सध्या धामणी धरणाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करून आमचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमचे संपवावे.

– दगडू कदम, धरणग्रस्त, राई, ता. राधानगरी.