धामोरीत 44 वर्षीय ग्रामपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

384

ग्रामपंचायत शिपायाने जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनालयाच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी कोपरगाव येथील धामोरी येथे घडली. या शिपायाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.

मोहन आबाजी वाणी (44) राहणार धामोरी असे या आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायतीमध्ये मोहन वाणी हा शिपाई कम वॉलमनचे काम करतो. मोहन मंगळवारी सकाळी 6 वाजेपूर्वी वॉलमन म्हणून पाणी सोडण्यासाठी कार्यालयात आला होता. काम झाल्यानंतर त्याने सार्वजनिक वाचनालयाच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत मोहन वाणी यांच्या घराचे बांधकाम काम सुरू असल्याने जुन्या ग्रामपंचायती शेजारी असलेल्या सभागृहात ते आपल्या कुटुंबासह गेल्या तीन-चार महिन्यांपासून राहत होते. मयत मोहन वाणी यांना पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी पोलिसांनी पोलिस पाटील संगिता विजय ताजणे यांच्यासमोर पंचनामा केला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मयताला खाली घेत तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून तो मृत घोषित केले. कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

मोहन यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी मयताचा मुलगा भागवत मोहन वाणी (24) यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिसात खबर दिली असून, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ. सी. एम. तोर्वेकर करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या