
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाऱया विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच काही तास परळीत जोरदार नाटय़ रंगले. धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लिप व्हायरल झाली आणि शनिवारी पंकजा यांना प्रचारसभेत व्यासपीठावरच भोवळ आली. धनंजय मुंडे यांच्यावर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
आरोप सिद्ध झाल्यास हे जग सोडून जाईन!
आपली बहीण पंकजाच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध झाल्यास मी हे जग सोडून जाईन, असे सांगत नव्याने दाखल झालेले भाऊ आमच्या नात्यात विष कालवण्याचे काम करीत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय महिला आयोगानेही त्यांना नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप एडिट करून तयार केल्याचा आरोप मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या सगळय़ा प्रसारामुळे उद्विग्न झालेल्या धनंजय मुंडे यांना रडूही कोसळले.
मला सहा बहिणी आहेत. तीन मुली आहेत. ज्या घरात बहुसंख्येने असा महिलांचा वावर आहे अशा घरातील माझ्यासारखी व्यक्ती महिलेचा अपमान करूच शकणार नाही. हा जो काळा डाग माझ्यावर लावण्यात आला आहे आणि माझ्यासारख्या भावावर असा अभद्र आरोप केला जात असेल तर असे राजकारणही नको आणि हे जीवनही नको, असे धनंजय मुंडे म्हणाले. निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्या मनात स्थान निर्माण करून जिंकण्याचा प्रयत्न करा. मात्र मला खलनायक करून निवडणूक जिंकू नका, असेही ते म्हणाले.
मी जे काही बोललो ते पंकजासंदर्भात बोललो नव्हतो; पण नव्याने दाखल झालेले भाऊ आम्हा बहीण-भावाच्या नात्यात विष कालवत असल्याचा आरोप मुंडे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केला. मी तसे बोललो असेन तर जा आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन तपासणी करा, असे सांगून मुंडे म्हणाले, माझ्या बदनामीचा हा प्रयत्न सुरू असून याबाबत मीसुद्धा फिर्याद दाखल केली; पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही.
आयुष्यातील सर्वात दुर्दैवी निवडणूक!
माझ्या जीवनातील सर्वात वाईट असणारी आणि धक्का देणारी ही निवडणूक ठरली आहे. माझ्यावरील आरोपांनी मी व्यथित झाले असून ही सर्वात दुर्दैवी निवडणूक आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांच्याकडून परळीत झालेल्या टीकेनंतर पंकजा मुंडे आज भगवान गडावर आल्या. तिथे त्यांनी भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, पहिल्यांदा असं वाईट बोलायचं आणि त्यानंतर खोटंही बोलायचं हे चुकीचं आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य करावं आणि त्यावर त्यांच्या गँगनं टाळ्याही वाजवाव्यात त्यामुळे शॉकच बसला. माझा रक्ताचा भाऊ असं बोलल्यामळे मी अस्वस्थ झाले.
धनंजयमुळेच कुटुंबात वाद
आमच्या कुटुंबात धनंजय मुंडेमुळेच वाद झाले आहेत. माझ्याबद्दल केलेल्या विधानामुळे मला त्यांचा तिरस्कार वाटतो. त्यांच्या खोटेपणाचा प्रचंड कंटाळा आला आहे. माझे पतीही या विधानामुळे व्यथित झाले आहेत. सध्या राज्यात विकृत राजकारण पाहायला मिळतंय. मलाच जर इतका त्रास होत असेल तर इतरांचे काय, असा सवालही पंकजा मुंडे यांनी केला.



























































