
सामना ऑनलाईन । कल्याण
फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील एका दुकानदाराकडून तब्बल 180 शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. धनंजय कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव असून तो भाजपाचा पदाधिकारी असल्याचे खासगी वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. कल्याण सत्र न्यायालयाने मंगळवारी धनंजयला पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाऊस ऑफ फॅशन’ नावाचे कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कुलकर्णीच्या दुकानावर पोलिसांची नजर होती. सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास पोलिसांनी दुकानात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे.



























































