धनंजय मुंडेना माझी प्रगती पाहवत नाही – प्रा. राम शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

पराभव समोर दिसत असल्यामुळे धनंजय मुंडे हतबल झाले आहेत. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते वाटेल ते बोलत आहेत. २००९ साली धनंजय मुंडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. सहाजिकच त्यांनी माझी शिफारस केली होती हे मी मान्य करतो परंतु ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. मी भाजपमधेच आहे. मंत्री असून पक्षाचा स्टार प्रचारक आहे. यामुळे त्यांना माझी प्रगती पहावत नाही म्हणूनच ते कदाचित अशी वक्तव्ये करीत आहेत, असे प्रत्युत्तर पालकमंत्री राम शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या टिकेला उत्तर दिले.

तालुक्यातील कुसडगाव येथे अयोजीत सभेत पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. खर्डा येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टिका करताना म्हणाले होते की, राम शिंदे यांना २००९ साली मीच तिकिट दिले. यांनी औद्योगिक वसाहत, कुकडीचे पाणी, जिल्हा उप रूग्णालय, अमृतलिंग हे जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वतः चे प्रश्न सोडवले. कोट्यावधी रुपयाचे बंगले सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख व राम शिंदे यांनी बांधले. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडे पाच वर्षांत अलीशान गाड्या आल्या कशा, या टिकेला उत्तर देताना पालकमंत्री राम शिंदे बोलत होते.

महायुतीच्या सरकारने पाच वर्षांत विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दररोज एक नेता भाजपमध्ये येत आहे. आजच विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुंडे बेताल वक्तव्य करीत आहेत. तांडावस्ती मी असताना अस्तित्वात आली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर निधी देऊन ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे.

पाच वर्षांतील विकास कामावरच तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी परत मोदीच पंतप्रधान हवेत. यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि विखेंना निवडणूक आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. मंत्रीपदाच्या काळात विकास खेचून आणला आहे. त्यामुळे उमेदवार निवडून येणारच आहे, मात्र मताधिक्य किती मिळेल हे महत्वाचे आहे. कामाची गती वाढवण्यासाठी विखेंना निवडणूक द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

यावेळी कुसडगावचे सरपंच प्रदीप कात्रजकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, उपसभापती सुर्यकांत मोरे, सुधीर राळेभात, भाजप जिल्हाउपाध्यक्ष आजीनाथ हजारे, गौतम उतेकर, बापु कार्ले, सोमनाथ राळेभात, मकरंद काशिद, संजय कार्ले, राजू देशपांडे, दिपक कात्रजकर, लहू शिंदे, सोमनाथ पाचरणे, करण ढवळे, मकरंद काशिद, संतोष कात्रजकर, कैलास वराट, रामदास शिरसाट, तुषार पवार, संभाजी वटाने, आप्पासाहेब कार्ले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.