तेव्हा मी ‘खलनायक’ सिनेमातील संजय दत्त होतो, धनंजय मुंडेंची फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेची सभा आज पाथर्डी येथे बाजार समितीच्या मैदानावर पार पडली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली. ‘पाच वर्षांपूर्वी मी पाथर्डी तालुक्याच्या दृष्टीने खलनायक सिनेमातील संजय दत्त होतो. मात्र शरद पवार व अजित पवार यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी पात्र झाल्याने आज माझे या तालुक्यात स्वागत होत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्व. मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र महामंडळ काढलेच नाही. हा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा व माझा अपमान असल्याचे मी मानतो. मात्र हा अपमान आहे असे त्यांच्या वारसदारांनाच वाटत नाही ही शोकांतीका आहे.

मी स्व. मुंडे यांनी जे प्रेम तुम्हाला दिले तेव्हडेच प्रेम तुम्हाला देईल. केंद्र व राज्य शासनाने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पायउतार करा. आजच्या बजेटमधे शेतकऱ्यांना 500 रुपये महिना देण्याचे जाहीर केले मात्र आणीबाणीत जे संघातील लोक तुरुंगात गेले होते त्यांना 10 हजार रुपये हे शासन देत असून या लोकांनीच आता देशात आणीबाणी आणली असल्याचे ते म्हणाले.