धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलकांनी फोडले

अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाने काढलेल्या महामोर्चाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास उशीर लावल्याने संतापलेल्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हल्ला चढवला. आंदोलकांनी तुफान दगडफेक करून अधिकाऱ्यांच्या गाडय़ांची तोडपह्ड केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जालना येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता गांधी चमन येथून हा मोर्चा निघाला. तासाभरात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. समाजातील मान्यवरांची भाषणे सुरू झाली. धनगर समाजाचा मोर्चा आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तासभर उलटूनही प्रशासनाच्या वतीने कोणीही निवेदन स्वीकारण्यास आले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याचा आग्रह

तासभर उलटूनही निवेदन घेण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी येत नसल्याने मोर्चेकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे निवेदन घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके आणि उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांना मोर्चेकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी पाठवले. तोपर्यंत मोर्चेकरी प्रवेशद्वार  तोडून आत घुसले.

खोटे गुन्हे दाखल करू नका

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोर्चेकरी तासभर ताटकळले. त्यामुळे संताप अनावर झाला आणि तोडपह्ड झाली. तोडपह्डीचे समर्थन कोणीही करणार नाही. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला पाहिजे. आम्हाला शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवायचे आहे. प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी मोर्चेकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

तोकडा पोलीस बंदोबस्त

धनगर समाजाचा मोर्चा धडकणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र हा बंदोबस्त अतिशय तोकडा होता. त्यामुळे अतिरिक्त फौजफाटा येईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक वाहनांची तोडपह्ड झाली होती. मुळात वातावरण संवेदनशील असल्यामुळे जास्तीचा बंदोबस्त का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गैरसमजातून घटना घडली, जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच आयोजकांचे तीन प्रतिनिधी निघाले होते. मात्र मोर्चातील काही आंदोलक अचानक आक्रमक झाल्यामुळे ते माघारी परतले. झालेली घटना ही गैरसमजातून घडली असल्याचा खुलासा जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.

दगडफेक, कुंडय़ा फेकल्या

प्रवेशद्वार तोडून आत घुसलेल्या मोर्चेकऱ्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच अफरातफर उडाली. दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली. त्यानंतर आवारात उभ्या असलेल्या दुचाकींसह इतर अधिकाऱ्यांच्या गाडय़ाही फोडण्यात आल्या. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.