आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समजात सिंधुदुर्गात मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

यळकोट यळकोट जय मल्हार…जोतिबाच्या नावानं चांगभल… आरक्षण मिळालेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीचा मोर्चा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला. पारंपारिक गजानृत्य सादर करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन सोडला. भर रस्त्यातून शेळ्यामेंढ्यांचा कळप घेवून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजावर 68 वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना सादर करण्यात आले.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन देत भाजप सरकार सत्तेवर आले.मात्र, धनगर आरक्षणाला अद्यापही केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला नाही. सरकारच्या याच नाकर्तेपणा विरोधात जिल्ह्यातील धनगर समाजाने एकवटत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीचे मुख्य संघटक सुरेश झोरे,किशोर वरक,संतोष पटकारे यांच्यासह विद्यार्थी,महिला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गजा नृत्य सादर करून आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. मोर्चात आंदोलक पारंपरिक धनगर वेशभूषेत आले होते.