धनगर समाजाला आरक्षण द्या, मुख्यमंत्र्यांना साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी.च्या आरक्षण अंमलबजावनी तात्काळ करावी, या व अन्य प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आले.

धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत एस.टी.चे आरक्षण दिलेले आहे. या आरक्षणांची अंमलबजावनी आतापर्यंत झालेली नाही. ही बाब अधोरेखीत करत गेल्या ७० वर्षापासून केवळ आश्वासने मिळाली. तसेच भाजपा सरकारने सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षणाची अंमलबजावनी करु, असे आश्वासन दिले होते. चार वर्ष झाली तरी अंमलबजावणी करण्यात आली नाही. या निवेदनात आरक्षण मागणीसह अहिल्याबाई होळकर, शेळी-मेंढी विकास महामंडळाला २ हजार कोटीचे अनुदान तात्काळ द्यावे, महाराष्ट्रातील मेंढपाळांसाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन राखीव करुन चारा उपलब्ध करुन द्यावा, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, प्रत्येक विद्यापीठात धनगर समाजाच्या विद्याथ्र्यांसाठी ५०० मुला-मुलींसाठी वसतीगृहाची स्थापना करावी, तांडा वस्तीसाठी वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील १९ वर्षिय योगेश कारके तरुणाने धनगर समाजाला एस.टी.च्या आरक्षणासाठी बलीदान दिले आहे. या तरुणाच्या कुटुंबीयास शासनाने ५० लाख रुपये व शासकीय नौकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील संपूर्ण धनगर समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पूर्णा, पालम, चारठाणा, राणी सावरगाव येथेही धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आला.