आमदार प्रकाश सोळंके माझे मार्गदर्शक – धनंजय मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार प्रकाश सोळंके हे माझे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्याप्रमाणे कायम माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अनुभव व मार्गदर्शनाचा आपल्याला कायम लाभ मिळेल, त्या माध्यमातून आपण जिल्ह्यासह राज्यातील जनतेसाठी आश्वासक कामगिरी करू;’ असे मत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असून आमदारकीचा राजीनामा देणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्यांनतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोळंके यांच्याशी चर्चा केली. प्रकाश सोळंके यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यांनतर सोळंके यांनी आपण राजीनामा देणार नाहीत, आमदार म्हणून अधिक जोमाने काम करणार आहोत, असे सांगितले, त्यांनतर आता याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माजलगाव मतदारसंघातून मताधिक्याने निवडून आलेले प्रकाश सोळंके यांनी पूर्वी आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर ही आपली शेवटची टर्म असल्याचेही सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीकडे बोलून दाखवले होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सोळंके आमदारकीचा राजीनामा देणार अशा बातम्या झळकल्या होत्या. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात 6 पैकी 4 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत. प्रकाश सोळंके हे सहकारासह विविध क्षेत्राचा अनुभव असलेले मार्गदर्शक व्यक्तीमत्व असून वडील पंडित अण्णा मुंडे यांच्याप्रमाणे प्रकाशदादा आपल्याला कायम आदरस्थानी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच प्रकाश दादांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याला आपण कायम प्राधान्य देऊ असेही मुंडेंनी सांगितले.