धनत्रयोदशीला करा लक्ष्मीमातेला प्रसन्न, मनातल्या इच्छा होतील पूर्ण!

दिवाळीत धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱयांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी घरोघरी लक्ष्मीमातेची पूजा करून तिला प्रसन्न केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या अनेक पद्धती असल्या तरी सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशी करा पूजा
– लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घेऊन त्याच्याभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचा कपडा ठेवून आणि अक्षतांचे स्वस्तिक काढावे.
– एक चांदी, तांबा किंवा मातीचा कलश घ्या. त्यात अर्ध्याहून अधिक पाणी आणि थोडे गंगाजल मिसळून तो कलश भरून घ्या. त्या कलशात फूल, अक्षता, सुटी नाणी आणि सुपारी टाका. त्यानंतर कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याची पाने त्याभोवती ठेवावीत.
– कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोने, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवून त्यासमोर अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर व्यापाराची डायरी, अवजारे तसेच केरसुणी समोरच्या बाजूला ठेवावी.
– लक्ष्मी आणि गणेशमूर्तीला, केरसुणीला हळद-कुंकू वाहा. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आता हातात फुलांच्या पाकळ्या, अक्षता घेऊन हात जोडा. शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीचे नामस्मरण करा. ’ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये, प्रसीद-प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालष्म्यै नमः’ हा मंत्रजाप करू शकता. त्यानंतर आरती करून नैवेद्य अर्पण करावा. शेवटी काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

आपली प्रतिक्रिया द्या