
धारावीच्या शाहूनगरात गॅस सिलिंडर लीक होऊन झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोहम्मद मेराज सिद्दीकी (28) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
धारावीच्या मुबारक हॉटेलच्या समोरच्या बाजूला असलेल्या शाहूनगर झोपडपट्टीत रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाला होता. तळ अधिक दोन मजले असलेल्या दोन घरांच्यामध्ये तो गॅस सिलिंडर ठेवल्याने ही दुर्घटना घडली. दुसऱया माळ्यावर राहणाऱया सिद्दीकीच्या घरातला गॅस लीक झाला होता. त्यामुळे त्याने गळती लागलेला गॅस सिलिंडर घराबाहेर काढून खाली आणला आणि दोन घरांच्या मध्ये मोकळ्या जागेत ढकलून दिला. मग तो घरात जाऊन बसला. त्याची हीच हलगर्जी महाग पडली. काही कळायच्या आत सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात 17 जण जखमी झाले. गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणाला मेराज सिद्दीकी याचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे स्पष्ट होताच शाहूनगर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 285, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































