
कोरोनाच्या विळख्यातून धारावीची सहिसलामत सुटका करणाऱया धारावी पॅटर्नवर लिहिलेले ‘दि धारावी मॉडेल’ हे इंग्रजी पुस्तक आता मराठीतही उपलब्ध झाले असून ऍमेझॉनसारख्या मोठय़ा ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने यशस्वीपणे राबवलेल्या धारावी मॉडेल (पॅटर्न)च्या यशोगाथेची माहिती जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या पुस्तकात दिली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने मराठी आवृत्तीचे प्रकाशन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज शिवाजी पार्क येथे झाले.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धारावीसाठी मुंबई महापालिकेने अथक मेहनत घेऊन नियोजनबद्ध अशी मोहीम राबवली आणि तीच ‘धारावी मॉडेल’ नावाने जगभरात गाजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारावी परिसरातील मोहिमेची कार्यवाही, अनुभवांची अत्यंत अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक व संशोधकीय नोंद दिघावकर यांनी ‘द धारावी मॉडेल’ या इंग्रजी पुस्तकात केली होती. त्याची ही मराठी आवृत्ती आहे. प्रकाशनावेळी खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते.
कोरोना व्यवस्थापनाचे अनुभव, आठवणी
धारावी मॉडेलमधील अनुभवांवर आधारित ‘द धारावी मॉडेल’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2021 साली झाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे पुस्तक मराठीत यावे, मराठी वाचकांपर्यंतदेखील पोहोचावे या दृष्टीने या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्याची सूचना दिघावकर यांना केली होती. त्यानुसार दिघावकर यांनी कुणाल मांडेकर, महापालिकेतील निवृत्त कर्मचारी अधिकारी शामल रावराणे आणि निवृत्त उपशिक्षणाधिकारी रवींद्र काळे यांच्या प्रयत्नांतून हे पुस्तक मराठीत आणले. धारावीतील ‘कोविड’ व्यवस्थापन करताना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक आहे, अशी माहिती या पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर यांनी दिली.
n ‘द धारावी मॉडेल’ हे मराठी भाषेतील पुस्तक इंग्रजी आवृत्तीप्रमाणेच ‘ई- बुक’ स्वरूपातदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
n ‘नोशन प्रेस’ या प्रकाशनचे हे पुस्तक ऍमेझॉन, बुक गंगा यांसारख्या ऑनलाइन पुस्तक विक्री पोर्टल आणि पुस्तकांच्या दुकानांवर उपलब्ध.
























































