धारावीत रस्ता खचला, रहदारी नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी येथील 60 फूट रस्त्याच्या मधलाच काही भाग आज या अचानक खचल्याची दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने रहदारी नसल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र मुख्य रस्त्यालाच तडा गेल्यामुळे दिवसभर वाहतुकीला फटका बसला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत दुरुस्ती पूर्ण रस्ता पूर्ववत होईल अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

धारावी येथील मुख्य रस्त्यावर बिस्मिल्ला हॉटेलसमोरील रस्त्या खालून मलनिस्सारण वाहिनी जाते. या वाहिनीतून गळती होत असल्याने माती भुसभुशीत होऊन रस्त्याला मोठे भगदाड पडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईत गेल्या काही दिवसांत रस्ता खचणे, भिंत खचण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे ऑगस्ट महिन्यात मलबार हिल येथील संरक्षण भिंत कोसळून बी.जी खेर मार्गाला तडा गेला होता. त्यानंतर गेल्याच महिन्यात गिरगाव येथे मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर खड्डा पडला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये आज रस्ता खचला.

दरम्यान, या घटनेनंतर रहिवाशांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाला कळवल्यानंतर मलनिस्सारण खात्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. या रस्त्याखालील मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करून त्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे.