धर्मादाय आयुक्तांचा निकाल येईपर्यंत कार्यभार सांभाळणार, प्रसाद कांबळी यांचा पवित्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील दीड- दोन वर्षांपासून नाटय़परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद सुरू आहे. अशातच नियामक मंडळाच्या सदस्यांनी निवडलेले अध्यक्ष नरेश गडेकर यांनी विश्वस्त शरद पवार यांच्या सूचनेनुसार कार्यकारी समिती आणि नियामक मंडळाची बैठक बुधवार, 6 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाटय़परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, तर धर्मादाय आयुक्तांचा अंतिम निकाल येईपर्यंत कार्यभार सांभाळणार असल्याचा पवित्रा प्रसाद कांबळी यांनी घेतला आहे.

नाटय़परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी प्रसाद कांबळी, मंगेश कदम, नाथा चितळे, योगेश सोमण उपस्थित होते. जोपर्यत धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात अंतिम निकाल लागत नाही, चेंज रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही विषयावर बोलणार नाही. मार्च 2023 पर्यंत आमचा कार्यकाळ आहे, तोपर्यंत आम्ही शांतपणे काम करत राहू, असे पोंक्षे यांनी सांगितले. येत्या 22 ऑक्टोबर रोजी कार्यकारीणीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर 15 दिवसांनी नियामकची बैठक होईल. याशिवाय 100 व्या नाटय़संमेलनाचे नियोजन करू, असे पोंक्षे स्पष्ट केले.

अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत सगळे गैरव्यवहार थांबवले. नाटय़ परिषदेचा फायदा करून दिला. 75 लाखांची थकबाकी वसूल करून दिली, याचा पुनरुच्चार प्रसाद कांबळी यांनी यावेळी केला.

कार्यकारी समितीची आणि नियामक मंडळाची सभा फक्त प्रमुख कार्यवाह बोलावू शकतात. घटनादुरुस्ती झाल्यानंतर विश्वस्तांच्या जागा भरल्या जातील असा ठराव 29 ऑक्टोबर 2020 रोजी विश्वस्तांच्या सभेत झाला होता. त्या बैठकीतील इतिवृत्तावर शरद पवार यांच्या सह्या असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.