साईबाबा ईश्वर नाहीत! म्हणे, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही,धीरेंद्र शास्त्रीचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhirendra-shastri

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्र्ााr यांनी आता शिर्डी साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका भक्ताने साईबाबांबाबत प्रश्न विचारताच ‘गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही’, ‘साईबाबांना संत म्हणू शकतो, पण ते ईश्वर नाहीत’ असे वक्तव्य धीरेंद्र शास्त्र्ााr यांनी केले आहे. त्यामुळे साईभक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य प्रदेशात जबलपूर येथे शनिवारी धीरेंद्र शास्त्री भगवत गीतेचे पारायण करत होते. यावेळी शास्त्र्ााr आणि उपस्थित भक्तांमध्ये खुली चर्चा सुरू होती. त्यावेळी एका भक्ताने साईबाबांची पूजा करावी की नको असा सवाल केला. त्यावर बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नाही बन सकता’ (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही) असे वक्तव्य करत साईबाबांना ईश्वर मानण्यास नकार दिला. आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत, कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत किंवा दुसऱया धर्माचे असो, त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून साईभक्तांकडून संताप व्यक्त होत आहे.

साईबाबांना संत, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही!

कोणतेही संत मग ते तुलसीदास असतील, सुरदास असतील किंवा इतर कोणतेही संत असोत, ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत, पण ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे असे सांगत धीरेंद्र शास्त्र्ााr यांनी साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही असेही ते म्हणाले.

साईभक्तांमध्ये संताप; शिर्डीत निषेध

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये करणाऱया बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तींनी निषेध केला असून धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्र्ााr यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धीरेंद्र शास्त्रीनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे, त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

धीरेंद्र शास्त्रीने साईबाबांविषयी केलेले वक्तव्य म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखे आहे. साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साई संस्थानकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावे ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आम्ही बाबांच्या शिकवणूकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रींने महाराष्ट्राची संतपरंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे.

संतांवर आघात, हाच सनातनी धर्म आहे का?

सध्या नवनवीन महाराज तयार होत असून सरकार त्यांना संरक्षण देत आहे. संत तुकारामांनंतर आता साईबाबांबद्दल त्यांनी वक्तव्य केले. साईबाबांबद्दलचे त्यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न असून संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का, असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी असून सरकारचे या गोष्टींना प्रोत्साहन असल्यासारखे दिसते. ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी आणि वर्णभेद निर्माण करणारी आहे. यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल तर लोकांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी धीरेंद्र शास्त्री आणि कालिचरण महाराज यांचा समाचार घेतला आहे.