दशकातील सर्वोत्तम संघांचे नेतृत्व हिंदुस्थानी क्रिकेटपटूंकडे, आयसीसीकडून तिन्ही संघांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीकडून रविवारी दशकातील सर्वोत्तम कसोटी, वन डे व टी-20 संघांतील खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील संघांचे नेतृत्व हिंदुस्थानी क्रिकेटपटूंकडे सोपवण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनी दशकातील सर्वोत्तम वन डे व टी-20 संघाचा कर्णधार ठरला, तर दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाच्या कर्णधारपदाची माळ विराट कोहलीच्या गळ्यात पडली.  

रोहित, अश्विन, बुमराहचाही समावेश

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसह आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या संघांमध्ये रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. कसोटी संघात विराट कोहलीसह रविचंद्रन अश्विन आहे. वन डे संघात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसह रोहित शर्मा आहे. टी-20 संघात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मासह जसप्रीत बुमराहचा समावेश आहे.  

पाकिस्तानवर नामुष्की

आयसीसीकडून दशकातील सर्वेत्तम कसोटी, वन डे व टी-20 संघ निवडला गेला. या तिन्ही संघांमध्ये पाकिस्तानच्या एकाही क्रिकेटपटूला स्थान मिळालेले नाही. पाकिस्तानी क्रिकेट संघावर ही लाजिरवाणी नामुष्की ओढवली आहे. हे संघ निवडण्यासाठी आयसीसीकडून एका पोलचे आयोजन करण्यात आले होते. या पोलमध्ये मिळालेल्या मतांच्या आधारावर हे संघ निवडण्यात आले आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या एकाही क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही.

महिलांच्या संघातही टीम इंडियाच्या खेळाडूंची एण्ट्री

आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या महिलांच्या संघातही टीम इंडियाच्या खेळाडूंनी एण्ट्री मारली आहे. दशकातील सर्वोत्तम वन डे महिला संघात मिताली राजसह झुलन गोस्वामीचा समावेश आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम टी-20 महिला संघात हरमनप्रीत कौरसह पूनम यादवला स्थान देण्यात आले आहे.

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ

ऑलिस्टर पूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीवन स्मिथ, कुमार संगक्कारा, बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅण्डरसन.

दशकातील सर्वोत्तम वन डे संघ

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, ए बी डिव्हीलीयर्स, शाकीब उल हसन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्प, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम टी-20 संघ

रोहित शर्मा, ख्रिस गेल, अॅरोन फिंच, विराट कोहली, ए बी डिव्हीलीयर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), कायरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम महिला वन डे संघ

एलिसा हिली, सुझी बेटस्, मिताली राज, मेग लॅनींग (कर्णधार), स्टेफनी टेलर, साराह टेलर, एलीस पेरी, डेन वॅन निकर्प, मेरीजेन पॅप, झुलन गोस्वामी, अनीशा मोहम्मद.

दशकातील सर्वोत्तम महिला टी-20 संघ

एलिसा हिली, सोफी डिवाईन, सुझी बेटस्, मेग लॅनींग (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डिएंड्रा डॉटीन, एलीस पेरी, अॅना श्रुबसोल, मेगन शुट, पूनम यादव.