विजयी समारोपासाठी टीम इंडिया सज्ज; अखेरच्या लढतीत धोनी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वेलिंग्टन

न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टनच्या अखेरच्या वन डे सामन्यात खेळण्यास अनुभवी महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे फिट असल्याचे हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या पाचव्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. धोनी संघात परतल्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूला डच्चू मिळेल, हे उद्याच कळेल. पण क्रिकेटतज्ज्ञांच्या मते दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या नऊ धावा करणाऱ्या नवख्या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे.चौथ्या लढतीत गमावलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आणि या मालिकेचा विजयी समारोप करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

तिसऱ्या सामन्यापूर्वी धोनीच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला होता. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला. विराट-धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला दारूण पराभव स्विकारावा लागला होता. हिंदुस्थानी संघ या लढतीत फक्त 92 धावांवर गारद झाला होता. पाच वन डे लढतीच्या मालिकेत हिंदुस्थान 3-1 ने आघाडीवर आहे. पहिल्या तीन सामन्यात दारूण अपयश आल्यानंतर चौथ्या सामन्यात किवीजने टीम इंडियाचा मोठा पराभव केला होता. आता पाचव्या एकदिवसीय सामन्यात मालिका विजेता हिंदुस्थानी संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंडच्या भेदक वेगवान गोलंदाजीपुढे टीम इंडियाची भक्कम फलंदाजी पार कोसळली होती. त्यामुळे अखेरच्या लढतीसाठी अनुभवी धोनीची निवड होणार हे निश्चित.

यजमान न्यूझीलंडला धक्का
अखेरच्या वन डे लढतीआधी यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे दुखापतीमुळे अखेरच्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

संघातील खेळाडू

हिंदुस्थान -रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी , केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या

न्यूझीलंड -केन विलियम्सन (कर्णधार ), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गप्टिल , कोलिन डि ग्रैंडहोम, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, टॉड एस्टल, लोकी फग्युर्सन, मैट हेनरी, कोलिन मुनरो, जिम्मी नीशाम, मिशेल सेंटनर आणि टिम साउथी