
सर्वाधिक जगण्याचा विक्रम करणारा आशियाई सिंह धीरजने वयाच्या 22 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. जुनागढच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयात 17 वर्षे वास्तव्य करणाऱया धीरजच्या जाण्याने प्राणिसंग्रहालय सुने सुने वाटू लागल्याची भावना त्याची काळजी घेणाऱया कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.
याआधी कोणत्याही आशियाई सिंहाने 20 वर्षांहून अधिक जगण्याचा विक्रम नोंदवलेला नाही. गीरच्या या सिंहांचे आयुष्यमान सरासरी 15 ते 17 वर्षे असते. गीरचे काही सिंह 19 ते 20 वर्षे जगले आहेत, पण धीरजने 22 वर्षे जगून वेगळा विक्रम केला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून सक्करबाग प्राणिसंग्रहालय हेच राजबिंडय़ा धीरजचे घर बनले होते.
17 वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर धीरजने काही दिवसांपासून खाणेपिणे सोडले होते. शनिवारी त्याने अखेर आपल्या पिंजऱयात प्राण सोडले आणि प्राणिसंग्रहालय सुने झाल्याची खंत तिथल्या कर्मचाऱयांनी व्यक्त केली.

























































