धुळ्यात सरपंच, सदस्यपदासाठी पोटनिवडणूक; बुरझड, फागणे येथे 70 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, धुळे

तालुक्यातील बुरझड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह अकरा जागांसाठी आणि फागणे येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. बुरझड येथे चार मतदान केंद्रांवर तर फागणे येथे बारा मतदान केंद्रांवर ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारापर्यंत सरासरी तीस टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी साडेपाचपर्यंतची मुदत होती. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाले. मतमोजणी तहसील कार्यालयात 25 मार्चला होणार आहे.

सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान यंत्रांची खात्री पटवून दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रामीण क्षेत्रात सकाळी शेतीविषयक काही कामे असल्याने तसेच घरी महिलांना घरकाम जास्त असल्याने दुपारी बारापर्यंत बारापर्यंत एकूण मतदानाच्या तुलनेत सरासरी तीस टक्के मतदान झाले, मतदान केंद्रावर साडेपाचपर्यंत हजेरी लावणाऱया प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावता येईल असे पूर्वीच सांगण्यात आले. त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील प्रतिसाद पाहता दोन्ही ठिकाणी सरासरी सत्तर टक्के मतदान झाले.

पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत डाव्याऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात आली. याबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी के.पी.बोरसे यांनी सांगितले. बुरझड येथे 2 हजार 777 तर फागणे येथे 8 हजार 607 मतदार होते.