फुलशेती कोमेजली! ग्राहकांची पाठ, पावसाचा फटका, मागणी घटल्याने शेतकरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पावसाने सरासरी ओलांडली. याचा मोठा फटका फुलशेतीसह इतर पिकांना बसला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाच्या भितीने शेतकऱ्यांनी फुलांचे उत्पादन घेणे टाळले. त्यामुळे यंदा फुलांची आवक कमी आणि दर जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे धुळे शहरात पुणे, नगर, नाशिक आणि इंदूर येथुन फुलांची आवक होत आहे. यंदा सणवार, लग्न सराईचा तामझाम कमी असल्याने फुलांची मागणीही दर वर्षीपेक्षा कमी आहे. ग्राहकांची पाठ, पावसाचा फटका, घटलेली मागणी अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जास्तीच्या पावसामुळे जिल्ह्यातील फुल उत्पादकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पावसाने फटका दिल्यानंतर कोरोना संसर्गाची लाट आली. यामुळे शेतकऱ्यांनी फुल शेती करणे टाळले. परिणामी जिल्ह्यात फुलांच्या उत्पन्नात मोठया प्रमाणात घट झाली. जास्तीच्या पावसाने विहिरींच्या पातळीत वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे लक्ष केंद्रीत केलेले नाही. त्यामुळे शहरातील फुल विक्रेते अडचणीत आले आहेत.

गेल्या महिनाभरापासून फुलांची मागणी वाढली आहे. परंतु आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. फुल विक्रेत्यांना पुणे, मुंबई, नाशिक, नगर आणि इंदूर येथुन फुले मागवावी लागतात. लग्न सराईमुळे मागणी वाढल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. फुलांचे दर जास्त असल्याने यंदा शेवंती, निशिगंध फुलांची मागणी घटली आहे. तर गुलाब, झेंडू आणि गॅलेंडच्या फुलांची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात थोडया प्रमाणात घसरण झाली आहे. पुढील काही काळात जिल्ह्यातील फुल उत्पादकांकडील फुले बाजारात आल्यानंतर फुलांच्या दरात घसरण होईल, अशी अपेक्षा विक्रेता चेतन गवळी या विक्रेत्याने व्यक्त केली.