धुळगावात शेतकऱयांची एल्गार परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओल्या दुष्काळामुळे तालुक्यात पिकांची वाट लागली असून सडलेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी आज धुळगावात शेतकऱयांची एल्गार परिषद झाली. काल सायगाव येथे एल्गार परिषद झाल्यानंतर आता किसान क्रांती एल्गार परिषदेने गावोगावी एल्गार परिषद घेण्याचे जाहीर केले आहे.
शेतकऱयांचे प्रश्न सोडवायला कोणी येणार नाही ते शेतकऱयांना स्वतःला सोडवावा लागेल. बँकांनी वसुलीकरिता नोटिसा तयार केलेल्या आहेत. जमिनीची जप्ती झाल्यास आपला उताऱयातून हक्क सोडावा लागेल. वीज बिले न भरल्यास रोहित्र मिळत नाही. सहा महिन्यांपासून कृषी पंप बंद आहे मग वीज बिले कशाचे मागता, असा सवाल करत रडायाचे नाही लढायचे. लवकरच प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी तयार राहा असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी केले.
आम्हाला पीक कर्ज द्या, मध्यम मुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही. आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकही शेतकऱयाकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नसल्याचे संतू पाटील झांबरे यांनी सांगितले. यावेळी परिषदेत किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, प्रहारचे हरिभाऊ महाजन, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदींसह धुळगाव येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
मागील वर्षी दुष्काळ आणि चालू हंगामात परतीच्या पावसाने उभी पिके सडली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला आर्थिक सक्षम करावे लागेल. याकरिता येथील हनुमान मंदिरात आजची सभा बोलविली होती. यावेळी प्रा. शिवाजी भालेराव व संजय सोमासे म्हणाले की, निवडणुका संपल्या, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र राज्यातल्या शेतकऱयांच्या गळय़ाभोवती अस्मानी-सुलतानी संकटांचा फास आवळला जात आहे. दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेला शेतकरी, 3 वर्षांपासून पीक कर्जाचे वाटप नाही, जिल्हा बँकेचे ठप्प झालेले व्यवहार यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कपाशी, मका, सोयाबीन, लाल कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याचे भालेराव व सोमासे म्हणाले.