
मधुमेही रुग्णांना हिवाळ्यात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी योग्य काळजी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. नाशिकच्या वोक्हार्ट रुग्णालयाच्या मधुमेहतज्ज्ञ डॉ.सुदर्शना पाटील यांनी हिवाळ्यात मधुमेही रुग्णांनी आपली काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.
जगभरात 75 टक्क्याहून अधिक नागरिक टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाने पिडीत असून दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. हा आजार केवळ प्रौढांपुरताच मर्यादीत न राहता तरुणांमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत आहे. मधुमेह हा एक जीवनशैलीचा आजार बनला आहे. रक्तातील असंतुलित साखरेची पातळी ही त्वचेसह शरीराच्या अनेक अवयवांवर प्रतिकूल परिणाम करते. मधुमेहाचा शरीरावरील प्रत्येक भागावर परिणाम होतो. मधुमेह किंवा मधुमेहापूर्वीची स्थिती असलेल्या बहुतेक लोकांना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीराच्या तापमानात बदल झाल्यामुळे शरीराला संतुलन साधण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशावेळी मधुमेहींनी विशेष काळजी घ्यावी. मधुमेहाचा विचार करता शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. टाइप 1 मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. हे लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये अधिकतः आढळते. यामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतात. टाईप 2 मधुमेह बहुतेक प्रौढांमध्ये आढळतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि बदलती जीवनशैली हे टाईप 2 मधुमेहाचे प्रमुख कारण आहे.
हिवाळ्यात थंडी वाढल्याने शरीराला अधिक ऊर्जेची आणि अधिक इन्सुलिनची गरज असते. या कारणामुळे तसेच या वातावरणात मेटाबॉलिजम बुस्ट होते त्यामुळे जास्त भूक लागते. जेव्हा जास्त भूक लागते तेव्हा कोणतेही पदार्थ अनियंत्रित पद्धतीने खाल्ले जातात. पण त्यातुलनेने हिवाळ्यात व्यायामाचे प्रमाणही कमी होते. आणि शारीरीक हालचालींअभावी हिवाळ्यात वजन वाढीची समस्या भेडसावू शकते जी मधूमेहींकरिता घातक ठरते. हिवाळ्यात कमी हालचाल होत असल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आहारातून सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ पूर्णपणे टाळणे योग्य राहिल. मधुमेहींनी फायबरयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात करावे. योग्य आहार घेतल्यास रक्तातील साखर आणि वजन या दोन्हींवरही नियंत्रण ठेवता येते.
मधुमेह वाढलेल्या व्यक्तींमध्ये हात आणि पायांच्या नसांना नुकसान होते. मज्जातंतू मेंदूला विविध संदेश पाठवत असल्याने त्यांचे नुकसान तापमानाशी संबंधित संदेशावर परिणाम करते. वारंवार लघवी होणे, थकवा येणे, तोंड कोरडे पडणे अशा समस्या मधुमेहींना भेडसावू शकते. अति थंडी आणि उष्णतेमुळे मधुमेह असलेल्या लोकांच्या पायाला इजा होऊ (डायबेटीक फुट) शकते. त्याकरिता पायांची नियमित तपासणी करुन वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.
























































