
उच्चशिक्षित, बडा व्यावसायिक आणि श्रीमंत असल्याचा आव आणत देशातील पंचताराकिंत हॉटेलमध्ये राहून बिल न देताच पोबारा करणाऱ्या 63 वर्षांच्या फुकट्याला ठाण्यातून नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याने एक दोन नव्हे तब्बल 187 हॉटेलला चुना लावल्याचे चौकशीत उघड झाले आहे. विन्सेंट जॉन असे त्या फुकट्याचे नाव आहे. हॉटेलमध्ये राहून महागडे मद्य, उंची सिगारेट, खानपान असा सर्व राजशाही थाट उपभोगून बिल न देताच तो हॉटेलमधून पोबारा करत होता. अपमानाचा बदला घेण्यासाठी तो फुकट्या बनल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिल्लीतील एका पंचताराकिंत हॉटेलमध्ये पर्यटक मार्गदर्शक म्हणून जॉन काम करत होता. 1989 मध्ये त्याला हॉटेलने सेवेतून काढले. मात्र, त्यावेळी त्याचे 2000 रुपये हॉटेलने दिले नाहीत. तसेच काम सोडण्यापूर्वी व्यवस्थापकाने त्यांचा अपमान केला आणि त्याला हॉटेलमधून बाहेर काढले. या घटनेनंतर जॉनचे आयुष्यच बदलले. त्यानंतर त्यांने पंचराकिंत हॉटेल बुक करून तेथील सर्व सुखसोयींचा फायदा घेतला आणि बिल न भरताच तो हॉटेलमधून पोबरा करायचा. तसेच हॉटेलमधून जाताना लॅपटॉप आणि हॉटेलवरील इतर वस्तूही तो लांबवत होता.
जॉन मूळचा तामिळनाडूतील असून पदवीधर आहे. त्यामुळे तो अस्खलीत इंग्रजीत संवाद साधत व्यवस्थापकांवर प्रभाव टाकत होता. त्यामुळे व्यवस्थापक त्यांना आगाऊ रक्कम न घेताच हॉटेलमध्ये प्रवेश देत होते. तो अविवाहीत आहे. हॉटेलची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्याला 1996 मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. तिहार कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा जुना धंदा सुरू केला आणि देशभरातील हॉटलेला चुना लावण्याचे काम सुरूच ठेवले.
जॉनला मंगळवारी ठाणे येथील घोडबंदर रोड येथील लॉजमधून अटक करण्यात आली, असे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. आपला दररोजचा खर्च भागवण्यासाठी आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा मार्ग निवडल्याचे जॉनने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमधील हॉटेलमध्ये खोली बुक करताना त्यांने 11 नावे वापरली आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली. देशभरात त्याने असे 187 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
हॉटेलची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. तसेच तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. वाशी येथील तुंगा हॉटेलच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी फसवणूकीचा आणि चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल केला. आपण व्यावसायिक असून कामासाठी आणि बैठकांसाठी हॉटेलमध्ये खोली बुक करत असल्याचे त्याने व्यवस्थापकांना सांगितले. तसेच व्यवस्थापकांशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधला. त्यामुळे व्यवस्थापकाने कोणतेही आगाऊ पैसे न घेताच त्यांना खोली दिली, असे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
हॉटेलमध्ये असताना जॉनने महागडे मद्य आणि सिगारेटची ऑर्डर केली. तसेच व्यावसायीक कामकाज आणि बैठकांसाठी लॅपटॉपची गरज असल्याचे सांगत हॉटेलकडून लॅपटॉपही घेतला. त्यांनी कॅटरिंग सर्व्हिससह हॉटेलच्या बैठकीची खोलीही बुक केली. त्यानंतर हॉटेलचे बिल न देताच पोबारा केला. याबाबत हॉटेलनने तक्रार दाखल केल्याने 14 डिसेंबरला जॉनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि ठाण्यातील लॉजमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून हॉटेलचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.
याआधी दिल्लीतील एका हॉटलचे सुमारे 50 हजाराचे बिल न भरताच त्याने पोबारा केला होता. तसेच रेडिसन येथे लॅपटॉप चोरला होता. कोचीतील ले मेरिडियन हॉटेलची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अशीच घटना केरळमध्येही उघडकीस आली होती. मुंबईतल्या जोगेश्वरीमधील कमरुद्दीन शेख (47) यांना एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी 2017 मध्ये अटक केली होती. हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. जॉनचाही मुंबईशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. 2013 मध्ये जॉनला अटक करून तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अनेकदा अशा प्रकरणात अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतरही जॉनच्या फुकट्या स्वभावात फरक पडला आहे. अस्खलीत इंग्रजीत संवाद साधत व्यवस्थापकांवर छाप पाडत हॉटेलला चुना लावण्याचा त्याचा धंदा सुरुच असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.































































