मोबाईल क्लिपमध्ये विनयभंग झाल्याचे स्पष्ट होत नाही, डीआयजी मोरेंचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल क्लिपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचे स्पष्ट होत नाही. गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही दिवस आधी तक्रारदार मुलीने आपल्या पालकांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची खोटी तक्रार दिली होती. तसेच दोन कुटुंबीयांमध्ये आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादावरून आपल्यावर आरोप करण्यात आले आहेत असा दावा डीआयजी निशिकांत मोरे यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात तळोजा पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.  अटक टाळण्यासाठी मोरे यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. यावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. हायकोर्टाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत याबाबतचा निकाल राखून ठेवला व सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.