यंदा ‘डिजिटल’ अत्रे कट्टा, पुण्यतिथीनिमित्त अत्रेंच्या साहित्याचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रख्यात साहित्यिक, विडंबनकार, झुंजार पत्रकार, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील अग्रणी आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 13 जूनला दिवसभर त्यांच्या साहित्याचा जागर होणार आहे. दादरच्या अत्रे कट्टय़ाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्ष बंद असलेला अत्रे कट्टा डिजिटल माध्यमातून पुनरुज्जीवित होणार आहे.

दादरच्या अत्रे कट्टय़ाच्या वतीने दर महिन्याला विविध उपक्रम राबवले जातात. मुंबईसह नाशिक आणि पुण्यातदेखील अत्रे कट्टा सुरू आहे. अत्रेंच्या पुण्यतिथीनिमित्ताने एका विशेष उपक्रमाद्वारे हा कट्टा पुन्हा सुरू होणार आहे. यात इच्छुक व्यक्ती अत्रे यांचे विनोदी किस्से, त्यांनी लिहिलेल्या विडंबन कवितांचे सादरीकरण किंवा अत्रे यांच्याविषयी लेख लिहून पाठवू शकतात. कविता, विनोदी किस्से सादरीकरणाचा व्हिडिओ पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा. हे व्हिडिओ 13 जूनला संस्थेच्या फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केले जातील, असे आयोजकांनी कळवले आहे.

डिजिटल माध्यमामुळे अत्रे कट्टा फक्त दादरपुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यभरातून किंवा राज्याबाहेरील कुणीही यात सहभागी होऊ शकते, असे दादरच्या आचार्य अत्रे कट्टय़ाचे अध्यक्ष विसूभाऊ बापट आणि सल्लागार-मार्गदर्शक राजेंद्र पै यांनी सांगितले आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – विसूभाऊ बापट – 9821903890, शिबानी जोशी – 9820317562.