
अलीकडच्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट व्यवहार करण्याकडे लोकांचा कल दिसत आहे. अगदी चहा, किराणा मालाच्या दुकानापासून मोठमोठय़ा स्टोअर्समध्ये डिजिटल पेमेंट सूचनांच्या पाटय़ा झळकलेल्या दिसतात. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मागील पाच वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये 550 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गुगल पे, पेटीएम, फोन पे आणि भीमसारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला सरासरी 122 कोटी रुपयांची देवाणघेवाण होत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर या डिजिटल व्यवहारात 550 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2016-17मध्ये 1004 करोड डिजिटल व्यवहार झाले होते. हा आकडा 2020-21मध्ये 5,554 कोटीपर्यंत पोचला आहे. 2021च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल व्यवहाराचा आकडा 2020च्या तुलनेत 100 टक्के जास्त वाढला आहे. क्यूआर कोडने यूपीआय पेमेंटची सुविधा आहे. याशिवाय आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यावर काम सुरू आहे. येत्या पाच वर्षांमध्ये या तंत्रात आणखी बदल होणार आहे.
पेटीएम अक्वल
मोबाईल पेमेंटच्या दुनियेत सध्यातरी पेटीएम अक्वल आहे. अनेकांचा पेटीएम वापरण्याकडे कल आहे. पेटीएमकडे सुमारे एक कोटी 60 लाख व्यावसायिक आस्थापनांनी पेमेंट भागीदारी केली आहे.
भविष्यात तंत्रज्ञानात होतील बदल
बायोमेट्रीक तंत्र – ज्याप्रमाणे आपण स्मार्टफोन अंगठा दाखवून अनलॉक करतो त्याचप्रमाणे फिंगर प्रिंट टेक्नॉलॉजीचा वापर पेमेंट जगतात करण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटनमधील काही बँका प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रीक कार्ड जारी करत आहेत.
आवाज हीच ओळख – अमेझॉन आणि गुगल पेसारख्या पंपन्या व्हॉईस पेमेंटचा प्रयोग करत आहेत. सध्या अमेरिकेत यावर काम सुरू आहे.
टॅप अण्ड गो पेमेंट – फक्त आपल्या पेमेंट कार्डाला मशीनमध्ये टॅप करायचे आणि जायचं. इतपं सोपं तंत्र जगभरात वेगाने पसरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्हिसा, मास्टर कार्ड आणि एनपीसीआयला ‘टॅप अँड गो पेमेंट’ला मंजुरी दिली आहे.
चेहऱयाची जादू – चेहऱयाचा वापर करणारे फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर चीनसारख्या देशात सुरू झाला आहे.



























































