डिजिटल जग किती सुरक्षित…?

375
digital-india-crime

>> अमित घोडेकर

अत्याधुनिक मोबाईल कॅमेरा कितीही दूरवरची प्रतिमा टीपू शकतो. हे आधुनिकीकरण कितपत सुरक्षित आहे…?

सॅमसंगने नुकताच जगातील सगळ्यात जास्त झूम असलेला मोबाईल सादर केला, गेल्याच वर्षी ओपो आणि हुवाई या कंपन्यांनीदेखील अशाच प्रकारचे अतिशय दूरवरचे सूक्ष्म फोटो घेणारे मोबाईल विकसित केले आहेत. या मोबाईलला सुपर झूम असेदेखील म्हणतात. या सगळ्या विकसित मोबाईलने चक्क डिजिटल कॅमेरालादेखील मागे टाकले आहे. अशा प्रकारचे मोबाईल कित्येक लांब अंतरावरचे फोटो सहज काढू शकतात. हे फोटो म्हणजे आपल्या डोळ्यांनीदेखील दिसणार नाही एवढय़ा अंतरावरचे फोटो अतिशय सहज काढू शकतात.

एवढे अतिशक्तिशाली हे मोबाईल्स आहेत. फक्त यातील महत्त्वाचा फरक एवढाच की, दुर्बिणीमधून आपण फक्त बघू शकतो आणि मोबाईलमधून आपण सहजपणे फोटो किंवा व्हिडीओ काढू शकतो. याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे पण तेवढाच तोटादेखील होणार आहे. फायदा म्हणजे दूरवरचे फोटो किंवा व्हिडीओ काढता येऊ शकतील आणि तोटा म्हणजे कोणीही आपले फोटो किंवा व्हिडीओ सहजपणे कितीही दूरवरून काढू शकतो. सॅमसंगने या मोबाईलच्या कॅमेराचा जो व्हिडीओ शेयर केला आहे तो बघितल्यावर कुतूहल आणि भीती या एकाच वेळेस दाटून येतात. त्या व्हिडीओमध्ये कोणालाही न दिसणाऱया एका अतिशय दूरच्या बिल्डिंगमधील दोन व्यक्तींचे बोलतानाचे फोटो आणि व्हिडीओ हा मोबाईल कसा सहजपणे घेऊ शकतो हे दाखवले आहे. आता कल्पना करा की, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा इतर ओळखीच्या लोकांचे खाजगी क्षण जर तुमच्या हितशत्रू, सराईत गुन्हेगार किंवा सायबर गुन्हेगारांनी काढले आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडून पैसे किंवा खंडणीची मागणी केली तर हा नवीन मोबाईल किंवा तंत्रज्ञान मनुष्य जातीला किती महागात पडेल?

मोबाईल/इंटरनेटवर वापरले जाणारे बरेच सॉफ्टवेअर हे आपला पाठलाग करत असतात आणि आपल्याला त्याचा मागमूसदेखील नसतो. इंटरनेट विश्वातील दादा कंपनी गुगलदेखील अनेक प्रकारे आपली बरीच माहिती आपल्याला माहीत नसताना त्यांच्याकडे साठवून ठेवत असते. खरेतर आपल्याला हे वापरताना ही सर्व माहिती किती सोयीची असा विचार करतो, पण ही माहिती मिळवण्यासाठी गुगल तुमच्यावर 24 तास प्रत्येक वेळेस नजर ठेवून असतो हे आपल्याला कळत नाही म्हणजे गुगल इंटरनेट किंवा जीपीएसचा वापर करून तुमच्या प्रत्येक ठिकाणाचा तुमच्या प्रत्येक भेटीगाठीची अतिशय सूक्ष्म अशी नोंद करत असते. अशी माहिती जर चुकूनदेखील कोणाच्या हाती पडली तर तुम्ही समजू शकता की तिचा कशा प्रकारे गैरवापर केला जाऊ शकतो.

कल्पना करा तुमची अशी सर्व वैयक्तिक माहिती जर कोणी तुम्हाला माहीत नसताना वापरली तर? आणि आता या सगळ्यात भर पडली आहे. अतिशक्तिशाली कॅमेऱयाची म्हणजे तुमचे लोकेशन, फाईल, तुम्ही कोणाशी काय बोलता; हे कमी होते की काय आता तुमचे व्हिडीओ आणि फोटो काढून तुमच्यावर पाळत ठेवली जाऊ शकते म्हणजे आजकालचे मोबाईल हे भविष्यातील चोर आणि गुप्तहेर देखील झाले आहेत. त्यामुळे डिजिटल युगात मनुष्य कधी नव्हे एवढा असुरक्षित झाला आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या