किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? दिग्विजय सिंह यांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
digvijay-singh

राममंदिराच्या भूमिपूजन मुहूर्तावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदीजी, तुम्ही अशुभ मुहूर्तावर भगवान राममंदिराचे भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात, असा सवाल कोरोना संकटातही होणाऱया कार्यक्रमाबाबत दिग्विजय सिंह यांनी केला आहे. अशुभ मुहूर्तावर भूमिपूजन करून हिंदू धर्माच्या परंपरा खंडित करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत राममंदिराचे श्रेय लाटणाऱया भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आलेला 5 ऑगस्ट हा दिवस अशुभ दिवस आहे. यासंदर्भात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनादेखील यापूर्वी सूचित केले आहे. त्यानंतरही केवळ मोदी यांच्या सुविधेसाठी अशुभ मुहूर्तावर भूमिपूजनाचा घाट घातला जात असल्याची टीका त्यांनी केली.