Video उपोषणाला बसलेल्या दिग्विजय सिंग यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

871
digvijay-singh

मध्य प्रदेशमधील 22 बंडखोर आमदारांना भेटायला गेलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना पोलिसांनी भेटण्यापासून रोखले. त्यामुळे दिग्विजय सिंग हे बंगळुरुच्या रमाडा हॉटेलबाहेरच कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले होते. त्यांना तेथून हटविण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले होते. राज्यपालांचे निर्देश टाळत कमलनाथ यांनी भाजपला जर वाटत असेल की आमच्याकडे बहुमत नाही तर सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव आणावा, असे आव्हान दिल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांची बंगळुरूतील रमाडा हॉटेलमध्ये भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना भेट घेण्यापासून रोखले. त्यानंतर दिग्विजय सिंग हे त्यांच्या समर्थकांसह हॉटेलबाहेर उपोषणाला बसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिग्विजय सिंग हे तेथून हटण्यास तयार नव्हते. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासह कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष डी.के शिवाकुमार, मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा, कांतीलाल भुरा यांना देखील ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या