
>>दिलीप जोशी, [email protected]
आज टपाल दिन. ई-व्यवहाराच्या आजच्या जमान्यात हस्तलिखित पत्राची कल्पनाच नव्या पिढीला येणं कठीण. परवा एका मालिकेत पेन-फ्रेंड असा उल्लेख एका बुजुर्ग व्यक्तीने केल्यावर त्याचा तरुण नातू विचारू लागला ‘पेन फ्रेंड’ म्हणजे काय? आणि आजोबा त्याला हाती लिहिलेले पत्र पाठवून मैत्री करण्याच्या विसाव्या शतकातल्या संकल्पनेबद्दल सांगू लागले. त्यावेळी बॉलपेन नव्हती. निब असलेलं शाईचं पेन वापरलं जायचं. या पेनाने पत्र लिहून जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी केलेली मैत्री ही ‘पेन-फ्रेंडशिप’ असायची. आता ई-मेल कशाला, क्षणार्धात ‘व्हॉट्स ऍप’वरून जगात कोणाशीही संपर्क साधता येतो. पृथ्वीवरच्या कुठल्याही देशातल्या आपल्या माणसाचं फोन-दर्शनही घडतं. पन्नास-साठ वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी आता रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. विदेशी तंत्रज्ञान आपल्याकडे येण्याचा वेग कमालीचा वाढला आहे.
अगदी चाळिसेक वर्षांपूर्वीही ही परिस्थिती नव्हती. आम्ही नातेवाईकांना, मित्रमंडळींना हाती पत्रं लिहीत होतो. मला आठवतंय एकोणीसशे सत्तरच्या दशकात आम्ही काही मित्र चार-सहा महिन्यांनी देशातलं एक राज्य बघायला पंधरा-वीस दिवस जात असू. त्यावेळी बरोबर पोस्टकार्ड नाहीतर आंतर्देशीय पत्रं असायची. कोलकाता, चेन्नई, जयपूर अशा लांब लांबच्या ठिकाणांहून किंवा त्याच्या आसपासच्या गावातून आठवडय़ाला एक पत्र घरी पाठवायचं. काही वेळा तर शंभर-दीडशे वस्तीच्या खेडय़ातल्या टपाल पेटीत टाकलेलं पत्रं घरी पोचेल की नाही याची शंका यायची, पण घरी परतल्यावर सगळी पत्रं वाचायला मिळायची. पोस्ट खात्याच्या या सेवेचं कौतुकमिश्रित आश्चर्य वाटायचं. आजही माझ्याकडे बऱ्याच नातेवाईकांची, मित्रांची, काही प्रसिद्ध लेखक-कवींची त्यांच्या हस्ताक्षरातली आणि देश-विदेशातून आलेली पत्रं जपून ठेवलेली आहेत. कधीतरी ती वाचताना त्या काळात गेल्यासारखं वाटतं.
पत्र पाठवण्याची पद्धत नेमकी कधीपासूनची? तर बहुधा, माणसाला लिहायला – वाचायला यायला लागलं तेव्हापासूनची. नल-दमयंतीच्या कथेत राजहंसाला पत्राची ने-आण करण्याची कामगिरी पार पाडावी लागायची. अलीकडे चित्रपटात ‘कबूतर जा जा’ करत संदेश पाठवण्याची युक्ती वापरली गेली आणि ‘हॅरी पॉटर’मध्ये ‘आऊल-पोस्ट’ आलं. एकूणच पक्षीगणांवर विश्वास ठेवून संदेशवहनाची कल्पना जगभर रुजलेली ही त्याकाळातली हवाई टपाल सेवा म्हणायला हवी. एरवी माणसं कोणाकरवी तरी पत्रं-खलिते पाठवीत. पत्र नेणारा दूत कधी चालत तर कधी घोडय़ावरून मैलोगणती प्रवास करत इच्छित स्थळी निरोप पोचवायचा. आफ्रिकेत पत्र पाठवायला ‘रनर’ असत. भाल्याच्या टोकाला पत्र अडकवून जंगलातून धावत ते सांगितल्या ठिकाणी जाते.
आता अस्तंगत होत चाललेली हस्तलिखित पत्रं सर्वसामान्य व्यक्तींनी पाठवण्याची सोय आधी युरोपात सुरू झाली आणि इंग्रजी राजवटीबरोबर आपल्याकडे आली. 1889 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकात लेखक बाळकृष्ण आचार्य आणि मोरो शिंगणे यांनी टपाल व्यवस्थेच्या प्रारंभाचे वर्णन केले आहे ते असे- ‘‘पूर्वी पत्रे पाठविण्याची काहीच सोय नव्हती. पुढे मुंबई बेट इंग्रजी लोकांच्या स्वाधीन झाले तेव्हा कंपनी सरकारने टपाल सर्वत्र सुरू केले. याप्रमाणे मुंबईत सुमारे 1694 मध्ये टपालाची स्थापना झाली. नंतर 1818 पासून त्याच्या शाखा गावोगावी पसरल्या. 1837 मध्ये ‘लिंडसे’ ही आगबोट एक महिन्यात इंग्लंडहून मुंबईस 3463 लखोटे आणि वर्तमानपत्रे घेऊन आली! …आता हे (टपाल) खाते इतके वाढले आहे की, पंधरा वर्षांमागे 2200 पोस्ट ऑफिसे होती ती आज (1889 मध्ये) 5500 होऊन गेली आहेत. पोस्ट ऑफिसांचा हा आकडा संबंध हिंदुस्थानातील असावा.’’
पोस्ट खाते सुरू झाले आणि दूरदूरच्या नातेवाईकांची, सुहृदांची परस्परांशी लेखी संवाद साधण्याची सोय झाली. दूरदेशी कामालाही जाणारा मुलगा खेडय़ातल्या आईवडिलांना ख्यालीखुशालीचं पत्र आणि पुढे ‘मनीऑर्डर’ही पाठवू लागला. सासरी गेलेल्या लेकीचं खुशालीचं पत्र आलं की, घराघरातल्या आयांचे डोळे पाणवू लागले. ‘खुशालीचं कार्ड टाकत जा अधून-मधून’ असं नातेवाईकांना सांगितलं जायचं. यातला ‘खुशाली’ शब्द फारसी तर कार्ड इंग्लिश. आहे की नाही गंमत! बोलीभाषेतले व्यवहार असेच रुजत असतात.
सिनेमाचं युग आल्यावर ‘फूल तुम्हें भेजा है खत में’ अशी ‘प्रेमळ’ पत्रं किंवा ‘डाकिया डाक लाया’ अशी भलाबुरा सांगावा घेऊन येणाऱ्या टपालाची गाणीही पडद्यावर झळकली. भावगीतात, लोकगीतात, ‘पत्रां’चा उल्लेख येऊ लागला. ‘पत्र तियेचे येता अवचित’, किंवा ‘पतुर आलं रायाचं, लिहिलंय मोठं गमतीचं’ असे भाव व्यक्त होऊ लागले. प्रत्यक्षात ही पत्र आणणारे कष्टाळू पोस्टमन घराघरातले काका-मामा झाले. काही ठिकाणी तर या मंडळींना पत्र वाचूनही दाखवावं लागायचं. आता ‘हवा येऊ द्या’ सारख्या कार्यक्रमानेही या पोस्टमन काकाचं महत्त्व अधोरेखित केलंय.
टपाल दिनानिमित्त सारं आठवलं. जुनी पत्रं पुन्हा चाळली. त्यातल्या हस्ताक्षरांबरोबर ते ते व्यक्तिमत्त्व नजरेसमोर पुन्हा साकारलं. त्यातली अनेक मंडळी आज नाहीत, पण त्या त्या क्षणी त्यांनी नोंदलेल्या भावना हा समृद्ध भूतकाळ आहे. आता हस्तलिखित पत्रं कुणी साठवली असतील तरच सापडायची. टपाल सेवा मात्र बदलत्या काळाशी मेळ घालत अव्याहत सुरू आहे. हिंदुस्थानात 1932 मध्ये पहिलं विमान जेआरडी टाटांनी स्वतः आणलं तेही टपालाचंच होतं.
























































