निरागसतेचे वय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्याची काय गंमत असते पहा. लहान असताना कधी एकदा ‘मोठं’ होऊ असं वाटत असतं आणि मोठेपणी बालपणातल्या आठवणीत मन रमतं. मध्यंतरी आम्ही सत्तरीकडे निघालेले मित्र आमच्या बालपणीच्या आठवणीत असेच रमलो होतो. खरंतर त्याच आठवणी सामाजिक होत्या. कारण तरुण वयापासून बहुतेकांचे मार्ग बदलले होते. तरुणपणाच्या कैफात आणि व्यस्त जीवनात वर्षानुवर्षे भेटीगाठीही झाल्या नव्हत्या. ‘वेळ नाही’ हे तेव्हाचं कारण होतं. पण आता थोडा निवांतपणा आला आणि कोविडने सर्वांनाच कंपल्सरी घरी बसवलं तेव्हा जो-तो आपुल्या जागी जखडून, फोनच्या माध्यमातून संवाद साधत जवळीक निर्माण करू लागला. ती मानवी मनाची गरजच असते. मुळात माणूस हा समाजशील प्राणी. महामारीच्या काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ म्हणजे परस्परांपासून दूर राहणं उचित होतं ते देहासंदर्भात मनाने जवळ राहणं त्या काळात जास्त गरजेचं होतं. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द रूढ झाला पण त्याचा आरोग्यासाठीचा अर्थ ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ असाच होता. योगायोगाने सेलफोनच्या माध्यमातून माणसं एकमेकांशी बोलू शकत होती. पाहू शकत होती. संवादाला साधन होतं.

अशा काळात बऱयाचदा ‘नॉस्टेब्जिया’ म्हणजे पूर्वकालीन स्मरणरंजन घडतं. तसंच आमच्या बालपणीच्या ‘रम्य’ आठवणींबाबत घडलं ‘त्या’ काळातले सुरपारंब्यांसारखे खेळ. मैलोगणती केलेली पायपीट, रानमेवा खात उनाडत घालवलेल्या शालेय सुट्टीच्या दुपारी कधी खाडी किंवा समुद्रकिनारी केलेली सफर, आता हरवलेल्या मिठी नदीचा एकेकाळचा स्वच्छ प्रवाह, लोखंडी सळईचा ‘गाडा’ चालवत केलेली पळापळ, शिवाय भोवरा, पतंग, आटय़ापाटय़ा, खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अशा मैदानी खेळांबरोबरच घरात मध्यरात्रीपर्यंत पत्ते, बुद्धिबळ, कॅरम वगैरे घरोघरचं साधं जेवण आणि हॉटेलात जाणं ही वर्षातून एखाद दिवसाची चैन अथवा एखाद्या सिनेमाची वार्षिक मजा असा तो काळ सर्वांनाच आठवला. त्यात अनेक रंग होते. घट्ट मैत्री, रुष्ट भांडणं सारं काही आता ते आठवताना हसू येत होतं.

या चर्चेचं निमित होतं ‘बालदिन’. 14 नोव्हेंबर हा आपले पाहिले प्रधानमंत्री नेहरूंचा जन्म दिवस ‘बालदिन’ म्हणून घोषित झाला त्या काळात नेहरूच सत्तेवर होते आणि शाळेत आमचे गुरुजी किंवा बाई या दिवसाचं महत्त्व सांगत असत… परवा एकूणच जगातल्या आजच्या बालकांविषयी विचार करताना लक्षात आलं की, सध्याच्या जवळपास आठ अब्ज जागतिक लोकसंख्येत सुमारे 2 अब्ज 20 कोटी मुलं एक ते बारा वर्षांतली आहेत. म्हणजे पंचवीस टक्के मानवी जग ‘निरागसते’च्या वयाचं आहे. या साऱया मुलांच्या वाटय़ाला मात्र बालहट्ट पुरवणारी सुबत्ता सगळीकडेच आहे असं नाही. प्रगत देशातल्या मुलांसाठी सर्व सुखसोयी असताना आफ्रिकेतल्या काही देशांतल्या बालकांचं बालपण करपून गेलेलं दिसेल. दारिद्रय़, राजकीय उलथापालथ याच्याशी त्यांचा काहीही संबंध नि आकलन नसताना त्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागत असल्याच्या चित्रफिती आज दिसतात. जगातली सुमारे 1 अब्ज 1 कोटी लहान मुलगे आणि सुमारे 95 लाख लहान मुलींच्या बालमनात आणि डोळ्यात निरागसतेचे भाव आहेत. त्यापैकी अनेकांना अनेक रोगांपासून वाचवण्याची गरज आहे.

जागतिक पातळीवर युनोसारख्या संघटनाही याबाबत प्रयत्न करतायत. पूर्वी म्हणजे पन्नास-साठ वर्षांपूर्वी बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं. 1990पासून ते खूप कमी झालं ही समाधानाची गोष्ट. पण त्यांना उत्तम आरोग्य आणि शिक्षण मिळण्याकडे लक्ष घ्यायला हवं. जगात आजही अनेक ठिकाणी बालमजुरांना कष्टप्रद जिणं जगावं लागतं. जीवनाच्या चटक्यांनी ती अकाली प्रौढ बनताना त्यांच्या उतारवयात त्याना कुठलं निरागस बालपण आठवणार? ‘वसुधैव कुटुंबकम’ असं आपण म्हणतो त्याची प्रचीती जगातल्या सर्व बालकांचं बालपण सुखाचं होईल तेव्हाच येईल.

अर्थात त्या परिस्थितीतही बालसुलभ खोडकरपणा करत ती मुलं आपलं जगणं आपणच ‘सुखाचं’ करण्याचा प्रयत्न करतात ही माणसाची जीवनेच्छा. जगण्याची जिद्द असते. उद्याच्या जगात सर्वच बालकांचा ‘बालदिन’ सुखाचा होऊन प्रौढपणी त्यांना ‘बालपणाचा काळ सुखाचा’ असं म्हणण्याची संधी मिळेल असं जग निर्माण व्हायला हवं.

परंतु वाढत्या प्रदूषणाचा, विस्फोटक राजकीय ताणतणावांचा अंधार दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. नव्या पिढीपुढे आपण काय वाढून ठेवतोय याचा विचार जगातल्या केवळ सत्ताधीशांनीच नव्हे तर सर्वच सुज्ञांनी करायला हवा… तसा तो करण्याची सद्बुद्धी मानवी मेंदूत नक्की आहे. सर्वांचंच आयुष्य ‘बालीश’ (चाईल्डिश) नव्हे, तर ‘बालसुलभ निरागसतेचं म्हणजे चाईल्ड लाईक झालं तर जग सौहार्दाने जवळ येईल. कारण निरागसतेला वय नसतं!