आभाळमाया : पहिली स्पेस पायलट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

महिला कोणत्याही क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतात हे आपण आतापर्यंत वाचलेल्या महिला अंतराळयात्रींच्या कामगिरीवरून लक्षात आलंच असेल. याच मालिकेतील आणखी एक धाडसी महिला अंतराळयात्री म्हणजे इलिन कॉलीन्स. 19 नोव्हेंबर 1956 रोजी जन्मलेल्या इलिनला साहसी गोष्टींची आवड होती. न्यूयॉर्क येथे शिक्षण घेत असताना तिने गर्ल स्काऊटमध्ये भाग घेतला होता. तेव्हापासूनच वैमानिक आणि अंतराळयात्री होण्याचं तिचं स्वप्न होतं.

न्यूयॉर्कमधील एलमावरा येथून 1974 मध्ये पदवीधर झाल्यानंतर इलिनने विज्ञान आणि गणितातही पदवी प्राप्त केली आणि अर्थशास्त्र विषयातही प्रावीण्य मिळवलं. नंतर वेबस्टर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ओक्लाहोमा येथे पायलट होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ती दाखल झाली. तिथला तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अमेरिकेच्या एअरफोर्स ऍकॅडमीत इलिन यांना गणिताच्या प्राध्यापक तसेच इन्स्ट्रक्टर पायलट म्हणून नोकरी मिळाली. अमेरिकन हवाई दलातील त्या दुसऱ्या महिला ठरल्या.

1990 मध्ये ‘ऍस्ट्रॉनॉट’ होण्याच्या प्रशिक्षणसाठी निवड झाल्यावर पाच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर 1995 मध्ये ‘डिस्कव्हरी’ यानाच्या शटल पायलट होण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यावेळी रशियन अंतराळ स्थानक ‘मीर’ अवकाशात भिरभिरत होतं. ‘डिस्कव्हरी’ आणि ‘मीर’ची भेट घडवणं ही महत्त्वाची अंतराळीय जबाबदारी इलिन यांना पूर्णत्वाला न्यायची होती. ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल नंतर त्या प्रतिष्ठत ‘हार्मन ट्रॉफी’च्या मानकरी ठरल्या. त्यानंतर 1997 मध्येही स्पेस पायलट होण्याची संधी त्यांना मिळाली.

याशिवाय 1999 मध्ये त्यांनी ‘चंद्रा स्पेस टेलिस्कोप’ अवकाशात स्थानापन्न करण्याच्या मोहिमेची कमांडर म्हणून नेतृत्व केलं. ही ‘चंद्रा’ दुर्बीण म्हणजे सर चंद्रशेखर वेंकटरमण यांचे पुतणे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावे अवकाशात पाठवलेली एक्स-रे दुर्बीण आहे. सुब्रमण्यम यांनी ताऱ्यांचा अंत कोणत्या प्रकारे होईल त्याच्या वस्तुमानाचं गणित मांडलं आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

त्यानंतर 2005 मध्ये इलिन कॉलीन्स यांना ‘स्पेस शटल’च्या ‘रिटर्न टू फ्लाइट’ मोहिमेचं नेतृत्व करता आले. 26 जुलै ते 9 ऑगस्ट 2005 या काळात स्पेस शटल 360 अंशांत फिरवण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं. अंतराळ स्थानकावरच्या अंतराळवीरांनं ‘स्पेस शटल’चे सर्व बाजूंनी छायाचित्रण करता येण्यासाठी असं करणं गरजेचं होतं, पण तितकंच ते जोखमीचंही होतं. इलिन कॉलीन्स यांनी ही कठीण कामगिरी यशस्वी केली. स्पेस शटलला अंतराळातील कचऱ्यापासून काही नुकसान तर झालेलं नाही ना याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्रण केलं गेलं होतं.

2006 मध्ये आपली इतर आवडनिवड जोपासण्यासाठी आणि कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्यासाठी इलिन कॉलीन्स यांनी ‘नासा’तून निवृत्ती घेतली. त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी आपल्या अंतराळातील अनुभवांवर तज्ञ म्हणून व्याख्यानं दिली. अनेक स्पेस फ्लाइटमधून एकूण 38 तास अंतराळयात्रा करणाऱ्या कॉलीन्सची कारकीर्द वैशिष्टय़पूर्ण आहे.

अमेरिकेतील आणखी एक महिला अंतराळयात्री ऑनशेह अन्सारी ही पहिली इटालियन – अमेरिकन महिला. तिचं वैशिष्टय़ म्हणजे ती अंतराळयात्रेचा खर्च स्वतःच उभारणारी (सेल्फ फंडेड) चौथी अंतराळयात्री. तिचं सहलेखकाबरोबरचं ‘माय ड्रीम ऑफ स्टार्स’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अन्सारी स्वतःला ‘स्पेस टुरिस्ट’ नव्हे तर ‘स्पेसफ्लाइ पार्टीसिपंट’ म्हणवणं पसंत करते.

येलेना कोन्डाकोवा या रशियन महिला अंतराळयात्रीचा एक वेगळाच विक्रम आहे. 4 ऑक्टोबर 1994 ते 22 मार्च 1995 असे तब्बल पाच महिने ‘मीर’ अंतराळस्थानकावर राहणारी ती पहिली महिला.

अंतराळयात्रींमध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अशा अनेक महिला आहेत. त्यापैकी महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि विविध देशांतील प्रथम महिला अंतराळवीर असणाऱ्यांचा थोडक्यात परिचय आपण या लेखमालेतून करून घेत आहोत.