
>>दिलीप जोशी
मालवणी विनोदाचे सम्राट मच्छिंद्र कांबळी म्हणजेच वस्त्रहरणमधील तात्या यांची पुनर्भेट घडविणारे हे ध्वनिमुद्रण.
मुंबईच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात ‘वस्त्रहरण’चा प्रयोग कमालीचा रंगला होता. मच्छिंद्र कांबळींचा तात्या सरपंच आणि दिलीप कांबळींचा गोटय़ा धमाल उडवत होते. आमच्यासह तिथल्या शेकडो प्रेक्षकांमध्ये बसलेले पु. ल. देशपांडे वाक्यावाक्याला दाद देताना मनमोकळेपणाने समरस झाले होते.
एक अंक संपला आणि पुलंचा भाषणाचा ‘विशेष अंक’ सुरू झाला. ‘वस्त्रहरण’च्या 175व्या प्रयोगानिमित्त पुल नाटकाचं कौतुक करायला आले होते. त्यांनी त्यांच्या सर्वपरिचित मिश्किल भाषेत सुरुवात केली, ‘‘खरा म्हणजे मी मालवणीतच बोलूक व्हया, पण जरा कठीण जातला… हे नाटक बघताना मी हसून-हसून अतिशय दमलोय. या मंडळींनी इतक्या सुंदर रीतीने हा पहिला अंक संपवलाय की, त्यानंतर आपण काही विनोद करणं म्हणजे आपल्याला विनोदबुद्धी नाही हे इतक्या लोकांसमोर सांगण्यासारखं आहे. हे नाटक पहिल्यांदा पाहिल्यानंतर पुढचे काही दिवस मी माझ्याकडे आलेल्या लोकांचं ‘वस्त्र्ाहरण’ करण्याशिवाय दुसरं काहीही करत नव्हतो. मला मोठी गंमत वाटली, यात काम करणारी मंडळी सूतगिरण्यांत काम करणारी आहेत, असं समजलं, कपडे करणाऱयांनी लोकांचं इतकं ‘वस्त्र्ाहरण’ करावं हेसुद्धा एक नाटय़च आहे असं म्हटलं पाहिजे.’’
पुलंनी असं गौरवलेलं गंगाराम गवाणकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित ‘वस्त्र्ाहरण’ या उंचीवर नेण्याचं काम केलं ते मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटय़ संचाने. हे नाटक पाहताना त्यातल्या तात्या सरपंचाचं इरसाल ‘बेअरिंग’ मच्छिंद्र कांबळी यांच्या देहबोलीतून इतक्या अप्रतिम पद्धतीने व्यक्त झालं की, त्या काळात साऱया महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही मालवणी बोलीचा झेंडा डौलाने फडकला.
या प्रयोगानंतर काही काळाने मच्छिंद्र कांबळी हे नाटक घेऊन लंडनला गेले. तिथे जाऊन परतल्यावर मी त्यांना भेटलो ते त्यांच्या चेंबूरमधल्या घरी. तो सर्व संवाद ध्वनिमुद्रित झाला. कांबळी सांगत होते, ‘‘खरं तर आपला सांस्कृतिक ठेवा जगापुढे यावा यासाठी सरकारी प्रोत्साहन मिळायला हवं, पण ते जमलं नाही आणि आमची जिद्द तर कायम होती. लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’चं आमंत्रण होतं. मित्रमंडळींनी मदत केली आणि आम्ही लंडनला पोचलो. त्याआधी निर्माते मोहन वाघ यांनी ‘गगनभेदी’चा प्रयोग तिथे केला होता. त्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन आम्ही गेलो होतो. तिथल्या प्रेक्षकांना नाटक खूप आवडलं. बहुतेक प्रेक्षक आपलेच म्हणजे मराठी होते, पण काही इंग्रजी प्रेक्षकही आले होते. भाषेचा प्रश्न असला तरी आमचा ‘ऍक्शन प्ले’ असल्याने त्यातला विनोद त्यांच्यापर्यंत पोचत होता आणि नाटक संपल्यावर त्यांनी आमचं कौतुक केलं. माझ्या आणि दिलीपच्या अभिनयाने ते ‘इप्रेस’ झाले होते.’’
लंडनच्या नाटय़गृहात नाटक करायची पूर्वतयारी कशी केली या प्रकारावर कांबळी म्हणाले, ‘मला आमच्या नाटकाचं नेपथ्य इथे असतं तसंच हवं होतं. ते तिथल्या थॉमस नावाच्या मॅनेजरकडून कसं करून घ्यायचं? हा प्रश्नच होता. प्रयोग संध्याकाळचा होता तरी सकाळी अकरा वाजताच मी थिएटरवर गेलो. माझं आणि त्यांचं इंग्रजी परस्परांना समजण्यातच एक वाजला, पण नंतर मात्र मी नुसत्या हावभावातून केलेल्या सूचना त्याला समजल्या आणि त्याने उत्कृष्ट नेपथ्य उभारलं. नाटक पाहून तोही हसून-हसून दमला होता. शेवटी त्याने मला सलाम केला.’’
लंडनला त्यांनी ‘माऊस ट्रप’ हे 19 पासून अव्याहत सुरू असलेलं ऍगाथा ख्रिस्ती यांचं सस्पेन्स नाटक पाहिलं…
‘‘ते मला काही फारसं आवडलं नाही. अर्थात आतापर्यंत त्याचा प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल’ असतो. आधी तिकीट ‘बुक’ करावं लागतं, पण तुलनेने आपली रंगभूमी उजवी आहे असं वाटलं. आता आमच्याच नाटकात बोलीभाषा, लावणी, तमाशा, दशावतार, पौराणिक आणि सोशल ड्रामा असं सगळं एकवटलेलं दिसेल. आम्हाला प्रोत्साहन मिळालं तर ‘वस्त्रहरण’ही असं वर्षानुवर्षे चालेल. उद्या चौथ्या पिढीतला ‘तात्या’ येईल!’’
‘‘लंडनच्या प्रयोगानंतर पॅरिसला जायचं होतं, पण इकडे इंदिराजींच्या हत्येने देश हादरला. आमचाही मूड गेला. आम्ही लगेच परतलो’ कांबळी सांगत होते. पुढच्या काळात संधी मिळाली तर मालवणीचा झेंडा देशात आणि विदेशातही फडकवण्याची त्यांची जिद्द होती, परंतु मालवणी विनोदाच्या या सम्राटाला काळाने फार लवकर गाठलं. अवघ्या 2007 मध्ये मच्छिंद्र कांबळी नावाचा रंगभूमीवरचा अलंकार गळून पडला. या लेखाच्या निमित्ताने खूप वर्षांनी त्यांचा आवाज ऐकला आणि ‘वस्त्र्ाहरण’मधल्या त्यांच्या ‘तात्या’ची पुनर्भेट झाली!

























































