
>> वैश्विक [email protected]
एका बाजूला आपण पारंपरिक चांद्रसण साजरे करतो, तर दुसरीकडे ‘नासा’सारख्या संस्था चंद्राचं दुर्बिणीद्वारे दर्शन घडवण्यासाठी चंद्रदर्शन रात्रीचा जागतिक कार्यक्रम जाहीर करतात आणि खगोल मंडळासारख्या संस्था आपल्याकडे ठिकठिकाणी जनसामान्यांना दुर्बिणीतून आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह न्याहाळण्याची संधी उपलब्ध करून देतात. वैज्ञानिक माहिती देतात.
यापेक्षा ‘चंद्रा’चा वेगळा ध्यास घेतलेला जगातला एक माणूस म्हणजे एलॉन मस्क. या महत्त्वाकांक्षी उद्योजकाला केवळ चंद्राचाच नव्हे तर एकूणच ग्रहमालेतील पर्यटनाची आस आहे. त्यातल्या त्यात जवळचे टप्पे म्हणजे अर्थातच चंद्र आणि मंगळ. 1969 मध्ये माणूस चंद्रावर गेला आणि आपण आपल्या ग्रहमालेत इतरत्रही विहार करू शकतो, असा आत्मविश्वास त्यामुळे संशोधकांना लाभला.
जगातल्या अनेक देशांच्या वैज्ञानिक चांद्रमोहिमा झाल्या. हिंदुस्थानच्या चांद्रयान-1चा सुद्धा त्यात महत्त्वपूर्ण वाटा आहेच. यापुढचं पाऊल म्हणजे आपल्या एखाद्या देशवासीयाने चंद्रावर पाऊल ठेवणे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आधी चंद्रावर पाठवण्याचं यान (रोव्हर) आणि मग माणूस असे हे प्रकल्प असतील. आपल्या ‘इस्रो’ला जागतिक अंतराळ संशोधन आणि यान प्रक्षेपणाच्या क्षेत्रात सन्मानाचं स्थान मिळालेलं आहे. तर मूळ गोष्ट एलॉन मस्कच्या अवकाश उपक्रमांची. संशोधक यानं सोडतील आणि वैज्ञानिक प्रयोग करणारे प्रशिक्षित अंतराळयात्री अवकाशात जातील ही आता नेहमीची घटना झाली. सर्वसामान्य माणसाला चांद्र परिक्रमा करायची असेल तर?… तर एलॉन मस्कच्या ‘स्पेस-एक्स’ संस्थेची (कंपनीची) योजना एकदम तयार आहे.
1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरले तेव्हा मायकेल कॉलिन्स (बिचारा) चांद्र परिक्रमा करत त्यांच्या ‘अपोलोमध्ये परतण्याची वाट पाहत होता. आता अशी चांद्र परिक्रमा सामान्य पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचा मस्क यांचा मस्त विचार आहे. त्यांच्या ‘बिग फाल्कन रॉकेट’ किंवा ‘बीएफआर’वर स्वार होऊन अनेक प्रवासी चंद्र परिक्रमा करून येऊ शकतील. दीड महिन्यापूर्वी मस्क यांनी ही योजना जाहीर केली.
अंतराळ कवेत घेण्याच्या आणि सामान्यजनांना ते आपल्या आवाक्यात आहे असं वाटायला लावणाऱ्या नित्यनव्या युक्त्या एलॉन मस्क लढवत असतात. स्पेस स्टेशनवर सामग्री पाठवण्याचे काम मस्क यांची स्पेस-एक्स कंपनी करतेच, पण एकदा तर त्यांनी त्यांच्या कंपनीची प्रसिद्ध ‘टेस्ला’ कारसुद्धा स्पेसमध्ये धाडली!
1972 मध्ये अपोलो मिशनद्वारे शेवटचा चांद्रवीर चंद्रावर उतरल्यानंतर चंद्राभोवती कोणा माणसाने चक्कर मारलेली नाही. स्पेस-एक्स कोणत्या दोन पर्यटकांना चांद्र प्रदक्षिणेला पाठवणार ते स्पष्ट झालेलं नसलं तरी 2018 हे वर्ष संपायच्या आतच हा प्रयोग यशस्वी करण्याचा स्पेस-एक्सचा निर्धार आहे. अमेरिकेलाही चंद्रावर एखादा कायमी तळ हवा असून तो ‘बेस’ धरून पृथ्वीबाहेरच्या अवकाशात यानं पाठवण्याचा त्यांच्या संशोधकांचा विचार आहे. केव्हा ना केव्हा चांद्रभूमीचा असा उपयोग माणूस करून घेणारच हे पहिल्या चांद्रविजयाच्या वेळीच अधोरेखित झालं होतं. यामध्ये यापुढे विविध देश सहभागी होतील. ‘स्पेस’ स्पर्धा वाढतच जाणार आहे. 2019 मध्ये चांद्रविजयाचा सुवर्ण महोत्सव (50 वर्षे) साजरा होईल. त्यानंतरच्या अर्धशतकात माणूस चंद्रावरचा रहिवासीही झालेला असेल. चांद्र पर्यटन, चंद्राचं जवळून दर्शन ही त्याची नुसती सुरुवात आहे. मस्कसारखी महत्त्वाकांक्षी माणसं आणखीही तयार होतील आणि चांद्र सफर घडवणाऱ्या टुरिस्ट कंपन्यांचीही स्पर्धा वाढत जाईल.





























































