आभाळमाया : विक्रमी स्पेस वॉक

वैश्विक

khagoldilip@gmail.com

गेल्या दोन लेखांमध्ये आपण अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा युजीन सोलार प्रोब आणि त्या यानाला ज्यांचं नाव दिलं गेलं ते कर्तृत्ववान शास्त्र्ाज्ञ युजीन पार्कर यांची माहिती घेतली. ‘युजीन सोलार प्रोब’चे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित उड्डाण यशस्वी झाल्याने ही माहिती आवश्यक होती. आता पुन्हा साहसी महिला अंतराळयात्रींविषयी जाणून घेऊ.

यावेळी ज्या अंतराळयात्रीचा परिचय आपण करून घेणार आहोत त्यांचं नाव आहे पेगी व्हिटसन. अमेरिकेतील आयोवा राज्यात बालपण गेलेल्या पेगी यांनी तिथल्याच विद्यापीठातून प्राणिशास्त्र्ा आणि रसायनशास्त्र्ाात पदवी मिळवली. नंतर राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्र्ाात त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर टेक्सास येथे प्राध्यापक म्हणून काम केलं.

1989 पासून त्या नासाच्या संपर्कात आल्या. त्यानंतर 1992 मध्ये रशिया-अमेरिकेच्या अवकाश-संशोधनाच्या सहकार्याचे पर्व सुरू झाल्यावर त्या रशियन स्पेस शटल ‘मीट’च्या प्रोग्रॅम-सहाय्यक झाल्या. यावेळी अमेरिका, रशिया संयुक्तपणे अंतराळातील जैविक आणि औषधी प्रयोगांबाबत संशोधन करत होते. 1995पासून त्या रशिया-अमेरिकेच्या सहयोगी ‘सायन्स वर्किंग ग्रुप’च्या सहसदस्य झाल्या.

1996 मध्ये पेगी यांची अंतराळयात्री म्हणून निवड झाली. दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना रशियात पाठविण्यात आलं. तेथे 14 दिवस पाण्याखाली राहून ‘नीमो-5’ मिशनचं नेतृत्व त्यांनी केलं. त्यानंतर अमेरिकेच्या इंटरनॅशन स्पेस स्टेशनच्या कमांडर म्हणून काम पाहू लागल्या. 2009 मध्ये पेगी व्हिटसन त्या नासाच्या अंतराळयात्री विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहू लागल्या.

2002 मध्ये पेगी यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर तब्बल सहा महिने राहण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी या अंतराळ-स्थानकावर मोबाईल सिस्टीम सुरू केली. अंतराळ स्थानकावरच्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. तेथे ‘हय़ुमनलाइफ आणि मायक्रोग्रॅव्हिटी’ विज्ञानविषयक प्रयोग त्यांनी केले. या अंतराळयात्रेत त्यांनी 185 दिवस अंतराळात व्यतीत केले.

2007 मध्ये सोयूझ या रशियन यानातून त्यांनी पुन्हा अंतराळात प्रस्थान ठेवलं. त्यावेळी परतताना या अंतराळवीरांना ‘बॅलॅस्टिक रिएण्ट्री’च्या वेळी थोडी समस्या निर्माण झाली होती. या यात्रेत पेगी व्हिटसन 191 दिवस अंतराळात होत्या.

पुन्हा 2007 च्या डिसेंबरमध्ये पेगी यांना चौथ्यांदा ‘स्पेस वॉक’ करण्याची संधी मिळाली. त्यांचं पाचवं अंतराळात चालणं साडेतीन तासांचं होतं. सहाव्या स्पेस वॉकमध्ये त्या अंतराळात 39 मिनिटं चालल्या होत्या.

2016 मध्ये त्या पुन्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोचल्या. यावेळी त्यांनी कोणत्याही अमेरिकन अंतराळवीरापेक्षा एकूण अधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला. याशिवाय पेगी यांच्या नावे असलेला विक्रम म्हणजे वयाच्या 56व्या वर्षी अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरल्या. 2017 च्या एप्रिल महिन्यात 24 तारखेला त्यांनी ‘नासा’च्या कोणत्याही अंतराळयात्रीचा अंतराळात राहण्याचा विक्रम मोडला. हिंदुस्थानी वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सात वेळा चालण्याचा केलेला आधीचा विक्रम मागे टाकून पेगी आठ वेळा स्पेस वॉक करणाऱ्या महिला म्हणून नावाजल्या. त्यांच्या अशा अनेक अंतराळ विक्रमांबद्दल ‘नासा’तर्फे अंतराळातील उत्तम नेतृत्वासह वेळोवेळी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं. 15 जून 2018 रोजी पेगी व्हिटसन यांनी निवृत्ती स्वीकारली.