दिलीप कुमार आणि मराठीपण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

दिलीप कुमार आणि मराठी कलाकार यांचे नाते वेगळेच होते. त्यांना मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट याबाबत नेहमीच विशेष प्रेम वाटले. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फूल चार हाफ’ (1991) या मराठी चित्रपटाचे निगेटिव्ह कटिंग दिलीप कुमारच्या शुभ हस्ते झाले. पुरुषोत्तम बेर्डेसाठी ही आयुष्यभरची विशेष आठवण झाली.

दिलीप कुमार आणि मराठीपण याबाबत आणखीन एक विशेष गोष्ट आहे, राजकमल कलामंदिर (युथ विंग) च्या किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ (1988) च्या सुवर्ण महोत्सवी इव्हेन्टस्ला चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीप कुमारची विशेष उपस्थिती होती. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्टस्चा अनुभव मी घेतला आहे आणि यानिमित्ताने व्ही. शांताराम आणि दिलीप कुमार यांना एकत्र पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा सुखद योग आला. यावेळी ते मराठी चित्रपटसृष्टीचे पाहुणे म्हणून आले होते. यावेळी दिलीप कुमारनी मराठी चित्रपटसृष्टीला मराठीत विशेष शुभेच्छा दिल्या. अतिशय भारावून जावे असे ते वातावरण होते. विशेष म्हणजे यावेळचा दिलीप कुमारसोबतचा अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पह्टो आजच्या ग्लोबल युगातील सोशल मीडियात भरपूर लाईक्स मिळवतोय. एकदा पुणे शहरात दिलीप कुमारनी अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ (1968) हा चित्रपट पाहून ‘हा चित्रपट आपल्याला असे गुंतवून ठेवतो की वेळ कसा जातो तेच समजत नाही’ असे गौरवोद्गार काढले.

दिलीप कुमारचे मराठी रंगभूमीवरचे प्रेम कायमच ठळकपणे व्यक्त झाले आहे. खरं तर तो वेगळा विषय आहे. संशयकल्लोळ, तीन पैशाचा तमाशा, तो मी नव्हेच, घाशीराम कोतवाल, अश्रूंची झाली फुले अशा अनेक नाटकांच्या काही विशेष प्रयोगांना दिलीपकुमारची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती होती आणि अगदी संपूर्ण नाटक अगदी शांतपणे पाहणे. खरं तर अनुभवणे. मध्यंतराला आवर्जून विंगेत येऊन अथवा स्टेजवरून त्या नाटकातील बारकावे सांगत सांगत प्रत्येक कलाकाराचे काwतुक करणे, त्यांना शाबासकी देणे हे त्यांचे वैशिष्टय़. विशेष म्हणजे शक्यतो हे भाषण मराठीत करणे आणि छान काwतुक करताना खास उर्दूतील नेमके शब्द वापरून आपल्या भाषणाला अधिकाधिक उंचीवर नेत, सर्वानाच मंत्रमुग्ध करणे. ‘संशयकल्लोळ’च्या वेळी दिलीप कुमारने आपल्या पाठीवरून काwतुकाचा फिरवलेला हात अशोक सराफच्या आजही लक्षात आहे. नव्वदच्या दशकात दिलीप कुमारने काही मराठी कलाकारांसोबत ‘ओ बाबा जान’ या नावाच्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारायचीही तयारी झाली होती. सतीश आळेकर त्या चित्रपटात भूमिका साकारणार होते. दिलीप कुमारने त्यासाठी त्या मराठी कलाकारांची मुंबई उपनगरातील एका तारांकित हॉटेलमध्ये राहण्याचीही व्यवस्था केली होती. तो चित्रपट प्रत्यक्षात सेटवर न जाताच बंद पडला. पण पुणे शहरात या एकूणच गोष्टीची खूपच चर्चा रंगली. विशेषतः एकदा सायरा बानूने या सर्व मंडळींसाठी एकदा केलेल्या टेस्टी खिचडीची चर्चा पुणे शहरात बरेच दिवस रंगली. हा चित्रपट दुर्दैवाने सेटवर न जाताच डब्यात गेला.

उमेश मेहरा दिग्दर्शित ‘किला’ (1998) या चित्रपटात दिलीप कुमारची दुहेरी भूमिका आहे. एक नायिका रेखा आहे. तर दुसरा दिलीप कुमार स्मिता जयकरचा नायक आहे. स्मिता जयकरने हा चित्रपट साईन करताच मी ‘या सोनेरी संधी’बाबत स्मिता जयकरची खास मुलाखत घेतली. तिच्यासाठी ही मोठीच आनंदाची गोष्ट होती.
दिलीप कुमारचा मराठी फंडा असा विविध स्तरांवरचा आहे. दिलीप कुमारच्या मोठेपणाला साजेशा असाच हा खास फंडा आहे.

आदिती गोवित्रिकरच्या घरी अनेकदा जाण्याचा योग आला. तिचे घर दिलीप कुमारच्या बंगल्याजवळच आहे हे एक विशेष आहे. यापुढे तसे जाणं होताना दिलीप कुमारची आठवण नक्कीच येईल आणि त्याच्या अनेक वैशिष्टय़ांसह मराठीपणही आठवेल हे नक्कीच.

‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘लागी नाही छूटे’ या द्वंद्वगीताच्या रेकॉर्डिंगला लता, दिलीपकुमार, ऋषिकेश मुखर्जी, शैलेंद्र व सलील चौधरी.