ठसा – बाळ कर्वे

>>दिलीप ठाकूर

चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ किंवा ‘मावशी, अगं मला भूक लागली आहे, पहिल्यांदा काहीतरी खायला तरी दे’ असे संवाद जरी आठवले की रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यांसमोर डोक्यावर पगडी, झुबकेदार मिशा, हातात सोटा घेतलेली, मोठ्या आवाजात बोलणारी व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर हमखास येते. ती व्यक्ती ‘त्या’ विशिष्ट नावाने कायमच ओळखली गेली, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे ऊर्फ ‘गुंड्याभाऊ.’ मुंबई दूरदर्शनवरील ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. बाळ कर्वे या भूमिकेच्या लोकप्रियतेने घराघरांत पोहचले. विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी लिहिलेल्या हलक्या फुलक्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती. बाळ कर्वे यांचा जन्म 25 ऑगस्ट 1939 रोजीचा. तीनच दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस झाला आणि 28  ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाचे वृत्त आले. बाळ कर्वे हे पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. त्यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण कर्वे.’ पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. मुंबई महापालिकेत नोकरी करताना सहकारी आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे त्यांना नाटकाचे प्रयोग, चित्रपटांचे चित्रीकरण यासाठी दौरे करता आले. पुढे शरद तळवलकर यांनीच ‘गुंड्याभाऊ’साठी बाळ कर्वे यांचे नाव सुचवले. दिलीप प्रभावळकर तेव्हा ‘पंचवीस एके पंचवीस’ हा कार्यक्रम करीत होते. त्यांचे नाव चिमणराव म्हणून नक्की झाले. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या बाळ कर्वे यांच्या नाटय़ क्षेत्रातील गुरू. ज्येष्ठ अभिनेते माधव वाटवे हे त्यांचे शेजारी. विलेपार्ले येथे एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत ते राहायचे. साहित्य संघात ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला वाटवे हे कर्वे यांना घेऊन गेले होते. तेथे ‘रंगायन’ची अनेक मंडळी होती. पुढे कर्वे यांनी ‘रंगायन’मध्ये प्रवेश केला. यातून ‘लोभ नसावा ही विनंती’ हे विजय तेंडुलकर यांचे नाटक त्यांनी राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केले. नाटकाला पारितोषिकही मिळाले. ‘रंगायन’संस्थेतही त्यांनी काही काळ काम केले. ‘रंगायन’च्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’या नाटकाचे प्रयोग जर्मनी येथे झाले. त्या दौऱ्यात प्रयोगाच्या वेळी ‘सेट’चे सर्व काम कर्वे यांनी पाहिले. विमानातून नेता येतील असा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता. यातून पुढे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटकांत बदली कलाकार म्हणूनही काम केले. प्रत्येक गोष्टीतून नवीन काही शिकावे ही त्यांची वृत्ती कायमच त्यांच्या पथ्यावर पडली. त्या काळातील कलाकार सर्वसाधारण आयुष्य जगण्यात आनंद घेत याचे हेदेखील एक उदाहरण. साहित्य संघाचे ‘संध्याछाया’ हे कर्वे यांचे पहिले व्यावसायिक नाटक. यात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका असताना कर्वे यांच्या वाटय़ाला छोटी भूमिका आली. पण आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या भूमिकेत  रंग भरले.  कर्वे यांचा आता नाटय़प्रवास सुरू झाला. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ आदी नाटकेही त्यांनी केली. माधव वाटवे यांनी दिग्दर्शित केलेले ‘आम्ही लटिके ना बोलू’ हे नाटकही त्यांनी केले. भक्ती बर्वे यांच्याबरोबरच्या ‘आई रिटायर होते’  या नाटकासाठी त्यांना राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला. विलेपार्ले येथील सुमंत वरणगावकर यांच्या ‘रंगमंच किलबिल’ संस्थेतर्फे त्यांनी काही बालनाटय़े सुरुवातीला केली होती.

बाळ कर्वे अतिशय चौकस व्यक्तिमत्व. याचा प्रत्यय अनेकदा येई. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची सूत्रे मोहन जोशी यांच्याकडे आली आणि त्यांनी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिराच्या डागडुजीचे व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. त्या वेळी कर्वे यांनी आपण स्थापत्य अभियंता व अभिनेता अशा दोन्ही भूमिकेत काम केलेले असल्यामुळे नाटय़गृहाच्या दुरुस्तीच्या कामात आपल्याला काम करायची इच्छा त्यांनी जोशी यांच्याकडे बोलून दाखविली होती. आणि ती पूर्ण झाली. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणं, बन्याबापू हे त्यांचे काही चित्रपट. ‘बन्याबापू’ या चित्रपटात ते चक्क नायिका सरला येवलेकरसोबत बागेत ‘प्रीतीचं  झुळझुळ पाणी’ हे  गाणे सादर करताना दिसतात. भारतमाता चित्रपटगृहात या चित्रपटाने उत्तम यश संपादन केले. सई परांजपे यांचा ‘कथा’ हा त्यांनी केलेला एकमात्र हिंदी चित्रपट. गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील त्यांनी साकार केलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. ‘महाश्वेता’ या मालिकेतही ते होते. ‘प्रपंच’, ‘वहिनीसाहेब’ तर अलीकडच्या ‘राधा ही बावरी’ आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकेतूनही कर्वे यांनी अभिनय केला. बाळ कर्वे आता आपल्यात नसले तरी त्यांचा ‘गुंड्याभाऊ’ कायम राहणार आहे!