आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयटीआयचा कोणताही ट्रेड घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत असलेल्या आणि दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

2022-23 शैक्षणिक वर्षासाठी होत असलेल्या पॉलिटेक्निक या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच ऑनलाइन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मागील काही वर्षांत पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून त्यात आणखी भर पडावी यासाठी तीन महत्त्वाचे बदल यंदा करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेश दिला जाणार आहे.

कोणत्याही ट्रेडमधून दहावीनंतरच्या आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध केली जाणार आहे. या नव्या बदलामुळे राज्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक प्रमोद नाईक उपस्थित होते.

6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशाची माहिती

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या अध्यापकांनी व संस्थांनी सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षांत पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतिवर्षी सलग 10 टक्के याप्रमाणे वाढ झाली आहे. यंदा आणखी वाढ होण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय 6 लाख 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले आहे.

प्रवेशाच्या दोनऐवजी तीन फेऱ्या

कोरोनामुळे गेल्या वर्षी प्रवेशाची एक फेरी कमी करण्यात आली होती. यंदा अधिकाधिक विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा यासाठी केंद्रिभूत प्रवेशाच्या फेऱ्यांची संख्या दोनवरून तीन करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या होणार आहेत.

प्रत्येक शाखेत 2 जागा राखीव

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदविका प्रवेशासाठी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील प्रत्येक शाखेत दोन जागा राखून ठेवण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या ‘स्वनाथ’ योजनेअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.