
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बॉलीवूड चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी ‘द्रौपदी’ हा चित्रपट तयार करत आहेत. थिएटर लेजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित ‘बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान’ या बंगाली बायोपिकनंतर हा त्यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे. देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची जादुई कथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी एकत्र आले असून बंगालचे सुपरस्टार देव अधिकारी आणि मुंबईचे प्रतीक चक्रवर्ती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
राम कमल मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून बंगालची आघाडीची अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा ही द्रौपदीची मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रख्यात लेखिका प्रतिभा रे यांची पुरस्कार विजेती ओडिया कादंबरी ‘यज्ञसेनी’वर आधारित आहे. यज्ञसेनी हे संयम, तपश्चर्या व सामर्थ्याचे प्रतीक आहे. राम कमल स्वतः लेखक असल्याने यज्ञसेनीच्या कथेला नक्कीच न्याय देतील. नवीन पिढीला आपली संस्कृती, वारसा सांगण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे लेखिका प्रतिभा रे यांनी सांगितले. रुक्मिणी मैत्रा म्हणते, द्रौपदीचे पात्र मला पडद्यावर साकारणे अत्यंत आव्हानात्मक वाटते. महाभारताच्या कथेचा भाग बनणे, ती भूमिका निभावणे ही माझ्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे.
हा चित्रपट बंगाली भाषेत तयार होणार असून संपूर्ण हिंदुस्थानात प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी सांगितले.


























































