पोटातून काढले 7.85 कोटींचे कोकेन 

युगांडा येथून मुंबईत आलेल्या एका पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 7.85 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने जप्त केले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून ते कोकेनचे पॉकेट्स जप्त केले. ड्रग तस्करीप्रकरणी त्या प्रवाशाला डीआरआयने अटक केली.

युगांडा येथून एक जण पोटातून कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळल्यानंतर डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सापळा रचला. चार दिवसांपूर्वी तो प्रवासी विमानतळावर आला. डीआरआयच्या अधिकाऱयाने त्याच्या बॅगेची तपासणी केली, मात्र काही आढळून आले नाही. त्या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या पोटाचा एक्सरे काढला. त्याच्या पोटात काही संशयास्पद वस्तू दिसल्या. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 65 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. त्यात 785 ग्रॅम कोकेन जप्त होते.

जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 7.85 कोटी रुपये इतकी होती. चौकशीदरम्यान त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली दिली. त्याला कोकेन तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. त्या प्रवाशाला नेमके ड्रग कोणी दिले याचा तपास डीआरआय करत आहेत.